गुजरातमध्ये टॅग केलेल्या दुर्मिळ तणमोरांचे महाराष्ट्रात आगमन

 गुजरातमध्ये टॅग केलेल्या दुर्मिळ तणमोरांचे महाराष्ट्रात आगमन

मुंबई, दि. ११ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तणमोर या लुप्त होण्याच्या मार्गावर असलेल्या पक्ष्याच्या जतन आणि संवर्धनासाठी वन विभागाकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. जगभरात तणमोर हे भारतीय उपखंडामध्येच सापडतात. या तणमोरांची संख्या आता केवळ ६००च्या आसपास उरली आहे. त्यामुळे तणमोरांविषयी माहिती मिळवण्याच्या उद्देशाने सन २०२०मध्ये गुजरातमध्ये वास्तव्यास असलेल्या १२ तणमोरांना टॅगिंग करण्यात आले. यातील तीन तणमोर महाराष्ट्रात आल्याचे त्यांच्या सर्वेक्षणात समोर आले असून, या तणमोरांसंदर्भात केलेला अभ्यास ४ नोव्हेंबरला प्रकाशित झालेल्या नेचर या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे.

‘अनरॅव्हलिंग द सिक्रेट्स ऑफ लेसर फ्लोरिकन – अ स्टडी ऑफ देअर होमरेंज अँड हॅबिटॅट युज इन गुजरात, इंडिया’ या शोधनिबंधासाठी मोहन राम, देवेश गढवी, आराधना साहू, नित्यानंद श्रीवास्तव, ताहीर अली राठेर, कपिल भाटिया आदींनी दोन वर्षे अभ्यास करून निरीक्षणे नोंदवली आहेत. २९ आणि ३० ऑक्टोबर २०२२ दरम्यान या तणमोरांनी आपले प्रजनन स्थळ सोडल्याचे दिसले.

हे तणमोर आपला अधिवास सोडून इतर ठिकाणी जाण्यासाठी अंतर्गत आणि बाह्य अशा दोन्ही घटकांचा प्रभाव असतो. बाह्य घटकांमध्ये गवत, झुडुपे, शेतीच्या जागांची उपलब्धता महत्त्वाची असते. हे तणमोर महाराष्ट्रात आल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यात उपलब्ध झालेला अधिवास, अन्नाची उपलब्धता याचा येत्या काळातही अभ्यास होण्याची गरज व्यक्त होत आहे. तसेच नष्ट होत जाणारी कुरणे, गवताळ प्रदेश जपली जाण्याची गरज या अभ्यासामुळे समोर आली आहे. तसेच हे पक्षी जगावेत यासाठी विद्युत तारा, कुंपण अशा धोक्यांवर विचार होण्याचीही गरजही या शोधनिबंधात व्यक्त करण्यात आली आहे.

SL/KA/SL

11 Nov. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *