वनक्षेत्रावर उभारण्यात येणाऱ्या कचरा डेपो विरोधात एकवटले PCMC चे रहिवासी
पिंपरी-चिंचवड, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पिंपरी-चिंचवड येथील प्रस्तावित कचरा डेपोच्या विरोधात एकत्र येत स्थानिक नागरिकांनी आज बाईक रॅकी काढून जोरदार निरदर्शने केली. पालिका हद्दीत असलेल्या वनक्षेत्रावर कचरा डेपो उभारण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवडमधील झाडे तोडून त्या ठिकाणी कचरा डेपो उभारण्यास नागरिकांनी मोठा विरोध दर्शवला आहे. त्या ऐवजी पालिका क्षेत्रातील अन्य पडीक जागांवर कचरा डेपो उभारण्यात यावा अशी मागणी पर्यावरण प्रेमींसह स्थानिक नागरिकांनी लावून धरली आहे.
पिंपरी चिंचवड महानगर पालिका क्षेत्रातील जे वनक्षेत्र कचरा डेपोसाठी तोडण्यात येणार आहे, त्या जागेच्या बदल्यात शासनाकडून वनविभागाला चंद्रपूर येथे पर्यायी जागा देण्यात येणार आहे. मात्र चंद्रपूरातील त्या जागेवर आधीच वनीकरण झालेले आहे. त्यामुळे नवीकरण झालेली जागाच पुन्हा वनीकरणासाठी देण्याने काहीच साध्य होणार नाही. आणि PCMC पालिका क्षेत्रातील झाडे मात्र कचरा डेपोसाठी हकनाक बळी जाणार आहेत. त्यामुळे शासनाच्या या दुटप्पी निर्णयाच्या सर्व स्तरांतून निषेध करण्यात येत आहे.