बेडेकर मसालेचे संचालक अतुल बेडेकर यांचे निधन

मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : व्ही.पी.बेडेकर अँड सन्स उद्योगाचे संचालक अतुल बेडेकर यांचे आज निधन झाले. वयाच्या ५६ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. लोणची, मसाले, चटणी यांसारख्या पारंपरिक मराठमोळ्या खाद्यपदार्थ व्यवसायातील अतुल बेडेकर हे प्रतिष्ठित व्यक्तीमत्व होते. देश आणि विदेशात मसाले, लोणचे, पापड यांच्या माध्यमातून घराघरात स्थान निर्माण केलेल्या बेडेकर उद्योग समुहाच्या चौथ्या पिढीचे प्रतिनिधित्व अतुल बेडेकर करत होते. घराघरात, मनामनांत मराठी व्यंजन संस्कृती पोहोचवणाऱ्या जुन्या मराठी उद्योग समुहाचे धडाडीचे वारसदार म्हणून त्यांचा नावलोकीक होता.
दर्जेदार उत्पादने, ग्राहकांच्या अभिरुचीची समज, अपेक्षेनुसार बदल आणि काळाच्या सुसंगतपणे व्यवसाय वाढवण्याचे अनुभवी कौशल्य यामुळे बेडेकर यांनी ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. मसाले, लोणचे, पापड, रेडी मिक्स इत्यादी बनवणारा बेडेकर समूह दिवंगत व्हीपी बेडेकर यांनी सुरू केला होता. १९१० मध्ये गिरगावमध्ये किराणा दुकान म्हणून त्यांनी व्यवसाय सुरू केला पुढे तो वाढला. १०० वर्षांहून अधिक काळ लोणची, पापड आणि मसाले या क्षेत्रात बेडेकर कार्यरत आहेत.
SL/KA/SL
3 Nov. 2023