महाराष्ट्र काँग्रेसच्या मीडिया विभागाला ‘प्रभासाक्षी’ पुरस्कार
मुंबई दि. ३१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला सर्वात वेगवान आणि तपशीलवार अपडेट आणि बातम्या माध्यमांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांच्या श्रेणीमध्ये प्रभासाक्षी राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये आयोजित विचार संगम या कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
’प्रभासाक्षी’ समूहाद्वारे द्वारे देशभरातील राजकीय पक्षांच्या माध्यम विभागाच्या कामकाजाचे सर्वेक्षण करण्यात येते. यावर्षीच्या सर्वेक्षणात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाने वेगवान आणि तपशीलवार अपडेट्स तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी व उर्दू अशा विविध भाषांमध्ये वेळेत आणि नेमकी माहिती माध्यमांपर्यंत पोहोचवण्यात देशात प्रथम क्रमांक मिळवल्याने महाराष्ट्र काँग्रेस कमिटीच्या मीडिया विभागाला प्रथम पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
सोमवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लब मध्ये आयोजित ‘प्रभासाक्षी’च्या २२ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात IAAN समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ.अनुज गर्ग आणि
निस्कॉर्ट मिडिया इन्स्टिट्यूटच्या प्राचार्य डॉ. रितु दुबे-तिवारी तसेच प्रभासाक्षीचे मुख्य संपादक निरज दुबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी या पुरस्काराबद्दल मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आणि माध्यम समन्वयक श्रीनिवास बिक्कड यांच्यासह संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. सद्याच्या परिस्थितीत मीडिया विभागाचे काम अत्यंत महत्वाचे आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे , राहुल गांधी यांचे विचार आणि भूमिका जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेसचा मीडिया विभाग करत आहे असे पटोले म्हणाले.
प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचा माध्यम विभाग काम करत असून त्यांनी आखून दिलेल्या रणनितीनुसार काँग्रेस पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहचविण्यासाठी माध्यम विभाग काम करत आहे. विभागाच्या कामाची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आली असून देशभरातील प्रथम पुरस्कार मिळाला आहे ही अत्यंत आनंदाची बाब असून विभागाच्या कार्याला बळ देणारी असे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे म्हणाले.
ML/KA/SL
31 Oct. 2023