उद्योगाला चालना देण्यासाठी अधिकाधिक उपक्रम हाती घ्यावेत
मुंबई, दि. 30 (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात जागतिक गुंतवणूक वाढविण्याच्या दृष्टीने विविध देशांशी परस्पर समन्वय वाढण्यासाठी विशेष प्रयत्न व्हावेत, स्टार्ट अप आणि नवोपक्रम सुरु करणाऱ्यांना विशेष प्रोत्साहन मिळावे, गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मॅग्नेटीक महाराष्ट्र उपक्रम अधिक व्यापकपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने राबवावा, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी उद्योग विभागाला दिले.
आगामी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला नागपूर येथे महिला उद्योजकांना व्यासपीठ मिळण्याच्या दृष्टीने नियोजन करावे आणि त्यात महाराष्ट्र उद्योग क्षेत्रात करत असलेल्या प्रगतीचा आढावा प्रदर्शनाच्या माध्यमातून घ्यावा, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आज विधानभवनात भारत आणि विविध देशांतील व्यापार-उद्योगास चालना देण्याच्या अनुषंगाने बैठक आयोजित केली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बिपीन शर्मा, ग्लोबल इंडिया बिझनेस फोरमचे अध्यक्ष डॉ. जितेंद्र जोशी, महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ॲन्ड इंडस्ट्रीज, पुणे चे सदस्य डॉ. विजय मालापुरे, सागर नागरे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उद्योग विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह दूरदृश्यसंवाद प्रणाली द्वारे उपस्थित होते.
या बैठकीत उद्योगाशी निगडित असणाऱ्या उद्योजकांच्या विविध संस्था आणि उद्योग विभागांमध्ये समन्वय साधून व्यवसाय वाढीच्या दृष्टीने प्रयत्न व्हावा, या अनुषंगाने चर्चा झाली. यापूर्वी महाराष्ट्र आणि विविध देश यांच्यात झालेले सामंजस्य करार, सद्यस्थिती याबाबतही उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी आढावा घेतला. आफ्रिकेत व्यवसायसंबंधी काय काम करता येईल. महिला उद्योजकांना उद्योग सुरु करण्याच्या अनुषंगाने अधिक सुलभता देणे,
त्याअनुषंगाने धोरण राबविणे, परदेशात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सुविधा, विविध विद्यापीठे आणि शासकीय विभाग यांच्यामध्ये आदानप्रदान वाढवून उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्यांसाठी इंटर्नशीप प्रोग्राम राबविणे आवश्यक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.
राज्यातील पर्यटनवाढीच्या संधी लक्षात घेऊनही काम व्हायला हवे. उद्योजकांच्या संघटना आणि राज्य शासन यांनी यासंदर्भातील कार्यक्रम हाती घेऊन त्यासंदर्भातील कामाला गती द्यावी. महाराष्ट्रातील सहा विभागांमध्ये शासनाच्या विभागामार्फत कार्यशाळा आयोजित केली जावी. महिला उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने नागपूर येथे अधिवेशन काळात परिषद आयोजित करण्यात येणार असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
ML/KA/SL
30 Oct. 2023