८ माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांना कतारने सुनावली फाशीची शिक्षा

दोहा, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : आंतरराष्ट्रीय स्तरावरून भारतासाठी एक भयंकर बातमी समोर आली आहे. कतार देशाने 8 माजी भारतीय नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा आरोप करत त्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे. या बातमीवर भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं नाराजी व्यक्त केली असून आम्ही याप्रकरणी सातत्यानं कतारच्या संपर्कात आहोत असं म्हटलं आहे.
या निर्णयाविरोधात भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं प्रसिद्धी पत्रक जाहीर करत याची माहिती दिली आहे.”फाशीच्या निर्णयाच्या शिक्षेने आम्ही आश्चर्यचकीत झालो आहोत. पण कोर्टाच्या विस्तृत निर्णयाची आम्ही वाट पहात आहोत. ज्यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे, त्यांच्या कुटुंबियांच्याही आम्ही संपर्कात आहोत. प्रत्येकजण कायदेशीर पर्याय शोधत आहे. आम्ही या प्रकरणावर बारकाईने लक्ष ठेवून आहोत. आम्ही सर्व कॉन्सुलर आणि कायदेशीर बाबींची तपासणी करणार असून आम्ही हा निर्णय कतारी अधिकाऱ्यांकडेही मांडू, असे परराष्ट्र मंत्रायलाने म्हटले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी
कतारमध्ये (Qutar) भारतीय नौदलाच्या आठ माजी कर्मचाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आठ महिन्यांपूर्वी या सर्वांना अटक करण्यात आली होती. हेरगिरी प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.हे सर्व नौदल अधिकारी दाहरा ग्लोबल टेक्नॉलॉजी आणि कन्सल्टन्सी सर्व्हिसेस या खासगी कंपनीसाठी काम करत होते. ही कंपनी कतार सरकारच्या नौदलाला प्रशिक्षण द्यायची. या माजी नौदल अधिकाऱ्यांवर इस्रायलसाठी हेरगिरी केल्याचा कतारने आरोप केला आहे. दरम्यान, या निर्णयाविरोधात भारत सरकार आपली भूमिका मांडणार असल्याचे परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आले आहे.
SL/KA/SL
26 Oct. 2023