आक्रोश यात्रा झाली हिंसक

कोल्हापूर , दि. 25 (एमएमसी न्यूज नेटवर्क): स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू असलेल्या आक्रोश यात्रा आता हिंसक झाली असून आंदोलकांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिल्याने हे आंदोलन चिघळत असल्याचे स्पष्ट झाले आहे.
४०० रूपयाच्या दुसऱ्या हप्त्याच्या मागणीसाठी गेल्या ७ दिवसापासून माजी खासदार राजू शेट्टी यांची आक्रोश पदयात्रा सुरू आहे.तसेच ४०० रूपये दिल्याशिवाय साखर कारखाने सुरू करू नयेत, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला असून ही चिपरी (ता.शिरोळ) येथील घोडावत जॉगरी कारखान्याने उसाची पहिली उचल जाहीर न करताच निमशिरगाव येथे ऊस तोड सुरू केली.त्यामुळे रात्री निमशिरगाव येथून ऊसाची वाहतूक सुरू असताना संतप्त कार्यकर्त्यांनी उसाचा ट्रॅक्टर पेटवून दिला.
या घटनेमुळे या परिसरात मोठा तणाव निर्माण झाला आहे.दरम्यान काही दिवसांपूर्वी देखील उसाचा दर जाहीर केल्याशिवाय ऊस तोडी आणि उसाची वाहतूक होऊ देणार नाही अशी भूमिका घेऊन स्वाभिमानीने उसाची वाहने रोखून धरली होती.अखेर संतप्त कार्यकर्त्यांनी उसाची वाहने पेटवून दिल्याने, स्वाभिमानीच्या आंदोलनाचा भडका उडाला आहे.रात्री उशिरा उशिरापर्यंत आग लागलेले वाहने विझवण्याचे काम सुरू होते.त्यामुळे ऊस दराचे आंदोलन चिघळण्यास सुरुवात झाली आहे.
ML/KA/PGB 25 Oct 2023