16 डिसेंबर रोजी रेसकोर्स येथे ऐतिहासीक बौद्ध धम्मदीक्षा समारोहाचे आयोजन
मुंबई दि.20( एम एमसी न्यूज नेटवर्क): भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी 16 डिसेंबर 1956 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्सवर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचा संकल्प जाहीर केला होता. मात्र त्यापूर्वीच 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महापरिनिर्वाण झाले. त्यामुळे त्यांचा तो संकल्प अधुरा राहिला. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अधुरा राहिलेला तो संकल्प पूर्ण करण्यासाठी येत्या 16 डिसेंबर 2023 रोजी मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स येथे भव्य ऐतिहासीक बौद्ध धम्मदीक्षा समारोहाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्याला 5 लाखापेक्षा अधिक बौद्ध बांधव उपस्थित राहणार असल्याची माहिती आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आझाद मैदानातील मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या ऐतीहासिक ठरणाऱ्या बौद्ध धम्मदिक्षा समारोहाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समितीच्या वतीने करण्यात आले आहे. या सोहळ्यास जागतिक बौद्ध धम्मगुरु दलाई लामा यांच्यासह श्रीलंका, व्हिएतनाम,थायलँड सह जगभरातील बौद्ध नेते उपस्थित राहणार आहेत. या बौद्ध धम्म दिक्षा सोहळ्यास देशभरातील सर्व बौध्द आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत, असे आठवले यांनी सांगितले. वंचित भुज आपसांतील मतभेद आणि राजकीय गटबाजी बाजुला ठेवून बौध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी ,बौध्द उपासक यांनी 16 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता आयोजित करण्यात आलेल्या बौद्ध धम्मदीक्षा समारोहास उपस्थित राहायचे आहे.
मुंबईत महालक्ष्मी रेसकोर्स वर धम्मदीक्षा सोहळा आयोजित करण्याचा महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा ऐतिहासीक संकल्प आपल्याला पूर्ण करायचा आहे. त्यासाठी सर्वानी भेदभाव, गटबाजी आणि राजकारण बाजुला ठेवुन बौद्ध अनुयायी म्हणून एकजुटीने उपस्थित राहण्याचे आवाहन डॉ बाबासाहेब आंबेडकर धम्मदीक्षा समारोह समिती तर्फे रामदास आठवले यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेत पूज्य भदंत डॉ राहुलबोधी महाथेरो, माजी राज्यमंत्री अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, पद्मश्री कल्पना सरोज दिलीप जगताप अविनाश कांबळे, आय आर एस अधिकारी सुबच्चन राम आदि अनेक मान्यवर उपस्थित होते.
ML/KA/SL
20 Oct. 2023