या केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ४ % वाढ

नवी दिल्ली, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : दसरा आणि दिवाळीचा सण काही दिवसांवर आलेला असताना केंद्र सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी दिली आहे. मोदी सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (डीए) ४ टक्क्यांनी वाढ करण्याची घोषणा केली. यासह केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता आता ४२ टक्क्यांवरून ४६ टक्क्यांवर पोहोचला असून वाढलेला डीए १ जुलैपासून लागू होईल. दरम्यान, सरकारच्या नव्या निर्णयाचा फायदा एक कोटींहून अधिक केंद्रीय कर्मचाऱ्यांना होणार असून यामध्ये ६० लाखांहून अधिक पेन्शनधारकांचाही समावेश आहे. गट क आणि अराजपत्रित गट ब श्रेणी अधिकार्यांसाठी हा बोनस मंजूर झाला आहे.
केंद्र सरकार वेळोवेळी आपल्या कर्मचार्यांचा महागाई भत्ता (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत (DR) वाढ करते. केंद्र सरकार वर्षातून दोनदा म्हणजेच जानेवारी आणि जुलैमध्ये महागाईनुसार कर्मचाऱ्यांच्या भत्त्यात सुधारणा करते. यापूर्वी जानेवारीत डीएमध्ये चार टक्के वाढ करण्यात आली होती. तर केंद्र सरकारच्या कर्मचार्यांसाठी DA ची गणना औद्योगिक कामगारांसाठी (CPI-IW) ग्राहक किंमत निर्देशांकाच्या आधारे केली जाते.
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात महागाई भत्ता महत्त्वाची भूमिका बजावतो. सरकार वर्षातून दोनदा DA मध्ये सुधारणा करते. ज्याचा लाभ त्यांना १ जानेवारी व १ जुलैपासून दिला जातो. महागाई भत्त्यात बदलाचा थेट परिणाम केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारावर दिसून येतो. DA वाढल्याने कर्मचाऱ्यांच्या हातातील पगारही वाढतो. सरकार महागाई दराची आकडेवारी लक्षात घेऊन महागाई भत्त्याबाबत अंतिम निर्णय घेते. महागाई जितकी जास्त असेल तितकी कर्मचाऱ्यांच्या डीएमध्ये वाढ अपेक्षित असते.
SL/KA/SL
18 Oct. 2023