पंतप्रधानांच्या हस्ते होणार ५११ ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ

मुंबई, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ग्रामीण भागात रोजगार निर्मितीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून विशेष प्रयत्न केवे जात आहेत. याचाच एक भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दुपारी 4:30 वाजता दुरदृश्य प्रणालीद्वारे महाराष्ट्रातील ५११ प्रमोद महाजन ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांचा शुभारंभ होणार आहे. ही कौशल्य विकास केंद्रे राज्यातील 34 ग्रामीण जिल्ह्यांमध्ये केंद्र स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक केंद्रामध्ये सुमारे 100 युवकांना किमान दोन व्यावसायिक अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाईल.
ग्रामीण भागातील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने या ग्रामीण कौशल्य विकास केंद्रांमध्ये विविध क्षेत्रांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. हे प्रशिक्षण पॅनल वर असलेल्या औद्योगिक भागीदारांद्वारे आणि राष्ट्रीय कौशल्य विकास मंडळाच्या विविध संस्थांमार्फत दिले जाईल. या केंद्रांच्या स्थापनेमुळे या क्षेत्रात अधिक सक्षम आणि कुशल मनुष्यबळ विकसित करण्यासाठी लक्षणीय प्रगती साधण्यात मदत होईल.
सध्या राज्यभरातील युवक शिक्षण आणि रोजगारांच्या संधींच्या अभावी शहरांकडे धाव घेत आहेत. त्यामुळे गावेच्या गावे ओस पडून ग्रामीण समाज व्यवस्था आणि मूल्यव्यवस्था ढासळत आहे. अशा स्थितीत या ग्रामीण कौशल्य विकास केंद्रामुळे ग्रामीण युवकांना रोजगारक्षम व्यावसायिक शिक्षण उपलब्ध होणार असल्यामुळे शिक्षण आणि नोकऱ्यांसाठी शहरांकडे वळणारा युवकवर्ग गावांमध्येच स्थिरावून ग्रामीण अर्थव्यवस्थेला हातभार लागेल अशी शक्यता या निमित्ताने निर्माण झाली आहे.
SL/KA/SL
18 Oct. 2023