अंधत्व ही आमची समस्या नाही ,आम्हाला समजून घ्या
नाशिक, दि. 16 (एमएमसी न्यूज नेटवर्क): द ब्लाइंड वेल्फेअर ऑर्गनायझेशन आणि रोटरी क्लब ग्रेप सिटी तसेच लायन्स क्लब सुप्रीम यांच्या संयुक्त विद्यमाने काल जागतिक पांढरी काठी दिनाचे औचित्य साधून लायन्स क्लब हॉल, पंडित कॉलनी नाशिक येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमास रोटरी क्लब ग्रेप सिटी चे अध्यक्ष जयंत करणार त्यांचे पदाधिकारी लायन्स क्लब सुप्रीमोचे समन्वयक शाम केदार, जे. पी जाधव , मानद अध्यक्ष कल्पना पांडे यावेळी मंचावर उपस्थित होते. यावेळी संस्थेच्या उपक्रमांची माहिती देताना संस्थेचे अध्यक्ष अरुण भारस्कर यांनी मंचावर उपस्थित असलेल्या मान्यवरांना संबोधित करताना सांगितले की आम्ही अंध असलो तरी आमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सकारात्मक ठेवा, अंधत्व ही आमची समस्याच नाही तर समाजाने आम्हाला समजून घ्यावे हीच आमची खरी मोठी अडचण आहे. जर अंध व्यक्ती विविध पदांवर काम करतोय किंवा अनेक उल्लेखनीय क्षेत्रात त्यांनी अलौकिक नाव कमावले आहे म्हणून आम्ही कुठलेही काम करू शकत नाही असे समाजाला का वाटते.
कार्यक्रमात उपस्थित असलेल्यांना सागर बोडके या अंध युवकाचे उदाहरण देण्यात आले . तो बँकेत नोकरी करत असताना देखील साऊथ आफ्रिकेत जाऊन त्याने माऊंट किलीमांजारो हा शिखर सर केले तसेच विविध उपक्रम आयोजित करण्यात आले होते ज्यामध्ये मनोहर गाडेकर, फयाज शेख, जनार्दन इंगळे, चंद्रकांत साळवे, दादा पानपाटील आणि महेंद्र मुसळे या दृष्टीहीन व्यक्तींना स्वयंरोजगाराकरता मदत करण्यात आली. तर गीत गायन स्पर्धेत कांतीलाल क्षीरसागर याने पहिला क्रमांक मिळविला तर विकास चव्हाण हा दुसऱ्या क्रमांकाचा मानकरी ठरला फयाज शेख याला तृतीय क्रमांकावर समाधानी राहावे लागले.
याच कार्यक्रमात 128 दृष्टीहीन व्यक्तींना पांढऱ्या काठीचे वितरण करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता महासचिव दत्ता पाटील, कोषाध्यक्ष विजय डबे मराठे, संचालक राजू व्यास, रेचल शिरसाठ यांनी विशेष परिश्रम घेतले. Blindness is not our problem, understand us
ML/KA/PGB
16 Oct 2023