निळवंडे कालव्यातून पाणी सुटले , शेतकऱ्यांचा जल्लोष
अहमदनगर, दि. 14 (एमएमसी न्यूज नेटवर्क): निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून आज पाणी सोडण्यात आले. डाव्या कालव्याची ३१ मे २०२३ रोजी चाचणी यशस्वी झाल्यानंतर लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची अनेक दिवसांपासून पाणी सोडण्याची मागणी होती.
डाव्या कालव्यातून एक टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामुळे लाभक्षेत्रातील कोरडे पडलेले पाझर तलाव, विहिरी, ओढे आणि जलस्रोतांना पाणी मिळून शेतपिकांना जल संजीवनी मिळणार आहे. यामुळे शेतकऱ्यांनी पुन्हा एकदा जल्लोष केला.
डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे निळवंडे येथे आगमन झाल्यावर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी थेट चर्चा केली. क्रामेड अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले.
यावर महसूलमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री विखे पाटील म्हणाले, उच्चस्तरीय कालव्यांची चाचणी करून ३० ऑक्टोंबर पर्यंत पाणी सोडण्यात येईल. उच्चस्तरीय कालव्यांतील वरच्या भागात वंचित राहिलेल्या १७०० हेक्टर क्षेत्रास पाणी देण्याच्या दृष्टीने दसऱ्यापूर्वी लोणी येथे शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक आयोजित करण्यात येईल.
प्रकल्पग्रस्तांना मुद्यावर स्वतंत्रपणे बैठक आयोजित करण्यात येऊन त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध आहे. अशा शब्दात महसूलमंत्र्यांनी शेतकऱ्यांना आश्वस्त केले. डाव्या कालव्याच्या चाचणी वेळी पाणी गळतीमुळे अनेक शेतकऱ्यांच्या शेतपीकांचे नुकसान झाले. अशा शेतकऱ्यांच्या शेतजमिनीचे स्वतंत्र पंचनामे करून नियामक मंडळाकडे भरपाईचा प्रस्ताव पाठविण्यात येईल.
कालव्यांसाठी अतिरिक्त भूसंपादन केलेल्या शेतजमिनी पडून आहेत. अशा शेतजमिनी मूळ शेतकऱ्यांना वर्ग करण्यासाठी शासन पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल. असेही महसूलमंत्री विखे-पाटील यांनी यावेळी सांगितले. पाणी सोडल्यानंतर महसूलमंत्र्यांनी सावरगाव पावसा येथे उजवा कालवा साईट पाहणी करून प्रलंबित कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
यावेळी माजी आमदार वैभव पिचड, निळवंडे प्रकल्पाचे अधीक्षक अभियंता बाळासाहेब शेटे, कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे, उप विभागीय अभियंता जी.व्ही.मगदूम , संगमनेर प्रांताधिकारी शैलेश हिंगे, अकोले तहसीलदार सतीश थिटे व मोठ्या संख्येने स्थानिक शेतकरी उपस्थित होते.
दरम्यान, डाव्या कालव्यातून पाणी सोडण्यात आल्याने निळवंडे पाटपाणी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी संगमनेर येथे जल्लोष केला. Water released from Nilwande canal, farmers rejoice
ML/KA/PGB
14 Oct 2023