सर्वोच्च न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना पुन्हा फटकारले

नवी दिल्ली, दि. 13 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महाराष्ट्रातील शिवसेनेच्या आमदारांच्या अपात्रता याचिकांवर आपण दिलेल्या निर्देशांचे पालन होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयाने आज पुन्हा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना फटकारले असून येत्या मंगळवारी सुनावणीचा कालावधी निश्चित करण्यास सांगितले आहे.
शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय स्थितीत उध्दव ठाकरे गटाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सह सोळा आमदारांना अपात्र ठरविण्यात यावे अशी याचिका अध्यक्षांकडे दाखल केली होती. त्यावर लवकर निर्णय होत नसल्याने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करीत त्याबाबत निर्देश देण्याची मागणी केली होती. यावर अध्यक्षांनी वेळापत्रक सादर करून सुनावणीच्या कालावधीची माहिती द्यावी असे निर्देश न्यायालयाने दिले होते.
त्यानंतर सर्व संबंधितांना नव्याने नोटीसा बजावून अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावणी प्रक्रिया सुरू करून त्याचे वेळापत्रक न्यायालयाला सादर केले. मात्र यासंदर्भातील सर्व याचिकांवर एकत्रित सुनावणी घ्या अशी मागणी ठाकरे गटाची आहे तर प्रत्येक याचिकेवर स्वतंत्र सुनावणी घ्या अशी शिंदे गटाची मागणी आहे. त्यावर येत्या वीस तारखेला अध्यक्ष निर्णय देणार आहेत.
ही अध्यक्षांची वेळकाढू भूमिका असून न्यायालयाने त्यात हस्तक्षेप करावा अशी विनंती पुन्हा ठाकरे गटाच्या नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात केली होती त्यावर आज सुनावणी झाली. अध्यक्ष नार्वेकर यांनी सुनावणीची कालमर्यादा निश्चित करून तसे मंगळवारी कळवावे , केंद्र सरकारचे महान्यायवादी अर्थात attorney general आणि राज्याचे महाधिवक्ता अर्थात advocate general यांनी अध्यक्षांना योग्य तो सल्ला द्यावा असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ही अशीच दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी देखील सर्वोच्च न्यायालयात होणार असून त्यातून काय निष्पन्न होते ते पहायचे.
ML/KA/PGB 13 Oct 2023