या आघाडीच्या सरकारी बँकेवर RBI कडून कारवाई

मुंबई, दि. १० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने देशातील आघाडीच्या सरकारी बँकेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. बँक ऑफ बडोदावर (Bank Of Baroda) RBI कारवाई केली आहे.यामुळे ग्राहकांवर थेट परिणाम होणार आहे. आरबीआयने बँक ऑफ बडोदाला (BoB) त्यांच्या मोबाईल अॅप ‘BoB वर्ल्ड’ वर नवीन ग्राहक जोडण्यास तात्काळ प्रभावाने मनाई केली आहे. म्हणजेच आता नवीन ग्राहक BoB च्या अॅपचा वापर करू शकणार नाही. ‘बँक ऑफ बडोदा’च्या जुन्या ग्राहकांवर याचा परिणाम होणार नाही. रिझर्व्ह बँकेने ‘बॉब वर्ल्ड’च्या जुन्या ग्राहकांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्याची सूचना बँकेला केली आहे.
रिझर्व्ह बँकेने सांगितले की, अॅपवर ग्राहक जोडले जाताना काही त्रुटी आढळल्या. ही चिंतेची बाब होती. आरबीआयने म्हटले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने, बँकिंग नियमन कायदा, 1949 च्या कलम 35A अंतर्गत आपल्या अधिकाराचा वापर करून, बँक ऑफ बडोदाला ‘बॉब वर्ल्ड’ वर अधिक ग्राहक जोडण्याची प्रक्रिया निलंबित करण्याचे निर्देश दिले आहेत. मोबाइल अॅपची सेवा तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आली आहे. नवीन ग्राहक अॅपशी जोडताना या त्रुटींवर मात करणे आवश्यक आहे. आरबीआयचे समाधान झाल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार असल्याचे आरबीआयने म्हटले.
याबरोबरच RBI ने अहमदनगर शहरातील 113 वर्षांपेक्षा जास्त जुन्या आणि जिल्ह्यातील मोठी सहकारी बँक असलेल्या नगर अर्बन को- ऑपरेटिव्ह बँकेचा (Nagar Urban Co-operative Bank) परवाना भारतीय रिझर्व बँकेने रद्द केला आहे. 5 ऑक्टोबरपासून बँकेचे कामकाज थांबवण्यात आले. बँकिंग व्यवसाय करण्यासाठी अर्बन बँकेकडे पुरेसे भांडवल आणि कमाईच्या संधी नाहीत.अशा स्थितीत बँक सुरू ठेवणे तिच्या ठेवीदारांच्या हिताच्या दृष्टीने चांगले नाही असेही रिझर्व्ह बँकेने म्हटले.
SL/KA/SL
10 Oct. 2023