रुग्णालयात सर्वसामान्यांचा बळी देणारे सरकार!
मुंबई, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : नांदेड येथील रुग्णालयामध्ये ४८ तासांत ३१ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच छत्रपती संभाजीनगर शहरातील घाटी रुग्णालयामध्ये २४ तासांत दोन नवजात बालकांसह १० जणांचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला असून मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेण्याची मागणी केली आहे.
वडेट्टीवार ट्विट मध्ये म्हणतात की,“मृतांच्या टाळूवरील लोणी खाणारे” ही म्हण आपण ऐकली आहे. पण लोणी खाण्यासाठी मृत्यू घडवून आणणारे राज्यकर्ते आज महाराष्ट्रात सत्ता चालवताय हे महाराष्ट्राच्या आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी दुर्दैवी अशी गोष्ट आहे.
नांदेड शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात कालपासून आणखी ७ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मृतकांमध्ये ४ बालकांचाही समावेश आहे. काल २४ आज ७ मृत्यू , ज्यामध्ये १६ निष्पाप बालकांचा समावेश आहे.
वडेट्टीवार पुढे म्हणाले की,
आधी ठाणे, आता नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर मधील घाटी रुग्णालयात मृत्यूचा थैमान… किती वेळा मंत्र्यांना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पाठीशी घालणार आहे ?
आरोग्यमंत्री कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती देत आहेत, आरोग्य खात्याचे हजारो कोटींची टेंडर काढण्यात येत आहेत. इकडे औषधांच्या तुटवड्यामुळे निष्पाप लोकांचा जीव जातोय. त्यामुळे टेंडर काढलेली कामे होत नाही आहे हे स्पष्ट आहे. मग टेंडरचा पैसा कुणाच्या खिशात चाललाय ? असा सवाल त्यांनी केला.
मुख्यमंत्र्यांनी तातडीने आरोग्यमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री दोघांचा राजीनामा घ्यावा. जर सरकारने दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा घेतला नाही तर हे महायुती सरकार नसून मलिदा खाण्यासाठी शासकीय रुग्णालयांना स्मशानघाटात रूपांतरित करणारे “हत्यारे सरकार” आहे हीच ओळख या सरकारची जनतेत निर्माण होईल, असे वडेट्टीवार यांनी म्हटले आहे.
ML/KA/SL
3 Oct. 2023