डॉ. प्रकाश खांडगे यांना शाहीर साबळे पुरस्कार जाहीर

ठाणे, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : डोंबिवली येथील प्रसिद्ध सांस्कृतिक संस्था यशराज ग्रुप तर्फे शाहीर कृष्णराव साबळे लोक गौरव पुरस्कार जाहीर झाला असल्याचे या संस्थेचे प्रमुख विवेक ताम्हणकर यांनी जाहीर केले आहे. त्यासोबतच डोंबिवलीतील सामाजिक कार्यकर्ते मधुकर चक्रदेव यांनाही सन्मानित करण्यात येत असल्याचे ताम्हणकर यांनी स्पष्ट केले.
गेली 45 वर्षे महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीचा, लोकसाहित्याचा, लोकसंस्कृतीचा, लोककलांचा मूलगामी अभ्यास करणारे मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे माजी विभाग प्रमुख प्रा.डॉ. प्रकाश खांडगे यांना त्यांच्या लोककलेतील योगदानाबद्दल हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. यापूर्वी तत्कालीन राष्ट्रपती महामहीम रामनाथ कोविंद यांच्या हस्ते डॉक्टर खांडगे यांना संगीत नाटक अकादमी चा पुरस्कार 2019 मध्ये प्राप्त झाला, त्यानंतर 2021 मध्ये भारत सरकारचा पद्मभूषण डॉक्टर कोमल कोठारी पुरस्कार देऊन त्यांनासन्मानित करण्यात आले आहे.
त्याशिवाय राज्य शासनाचा सांस्कृतिक पुरस्कार, राज्य वाङ्मय पुरस्कार, शिवनेरी भूषण पुरस्कार विविध पुरस्कारांनी त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला आहे.सदर कार्यक्रम ब्लॉसम इंटरनॅशनल स्कूल सभागृह डोंबिवली पूर्व येथे रविवार दिनांक 8 ऑक्टोबर रोजी सायंकाळी सात वाजता आयोजित करण्यात आला आहे.महाराष्ट्राच्या लोककलेचे मानबिंदू पद्मश्री शाहीर साबळे यांच्या नावे दिला जाणारा पुरस्कार त्यांचे परममित्र लोककलेचे जेष्ठ अभ्यासक डॉ. प्रकाश खांडगे यांना जाहीर झाल्याबद्दल आम्हा सर्व लोककलावंतांना अभिमान आहे. अशी प्रतिक्रिया मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीचे विभाग प्रमुख डॉ. गणेश चंदनशिवे यांनी व्यक्त केली.
ML/KA/SL
3 Oct. 2023