मुंबई विमानतळावर कोसळले चार्टर्ड विमान

मुंबई, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत आज सायंकाळी ५ च्या सुमारास लिअरजेटचे एक विमान अचानक धावपट्टीवरून घसरले. त्यानंतर या विमानाने पेटही घेतला. मात्र सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.मिळालेल्या माहितीनुसार, वैझाग ते मुंबई हे लिअरजेटचे विमान मुंबईत मुसळधार पावसामुळे धावपट्टीवरून घसरले.यावेळी प्रचंड पाऊस पडत होता. खराब हवामान होतं. त्यामुळे लँडिंग करत असताना जमिनीच्या अवघ्या काही अंतरावर असताना हे विमान क्रॅश झालं. हे विमान रनवे 27 येथे लँड होणार होतं. पण त्याआधीच ही दुर्घटना घडली. या विमानात एकूण सहा प्रवासी आणि दोन कर्मचारी होते. त्यावेळी दृश्यता ७०० मीटर होती. घाटकोपर-कुर्ला दरम्यान असलेल्या मुख्य धावपट्टीवर ही घटना घडली. सध्या दोन्ही धावपट्ट्या बंद करण्यात आल्या आहेत.
विमान क्रॅश झाल्यानंतर तातडीने पोलीस, एयरपोर्ट अथॉरिटी टीम, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. सुरक्षा पथकांनी तातडीने विमानात असलेले क्रू-मेंबर्स आणि इतर नागरिकांना वाचवण्याचे प्रयत्न सुरु केले. अपघातग्रस्त विमानातून सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. या विमान अपघातात तीन जण जखमी झाले. तर पाच जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात आलं. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलंय. या घटनेमुळे विमान वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
ML/KA/SL
14 Sept. 2023