जाणून घ्या G-20 चा लोगो आणि थिम

नवी दिल्ली, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : ९ व १० सप्टेंबर रोजी दिल्लीमध्ये होणाऱ्या जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीकडे संपूर्ण जगाचे लक्ष आहे. या निमित्ताने घेतल्या जाणाऱ्या सुरक्षा विषयक खबरदारीमुळे राजधानी दिल्लीला जणू लष्करी छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. या बैठकीसाठी १९ देशांचे, तसेच युरोपियन युनियनचे प्रतिनिधी भारतात येणार असून, ती यशस्वी व्हावी यासाठी भारताकडून पूर्ण प्रयत्न केले जात आहेत. दरम्यान, या वर्षी जी-२० बैठकीचे यजमानपद भारताकडे असून, भारताने या बैठकीसाठी तयार केलेल्या लोगोची सर्वत्र चर्चा आहे.
जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकांचे यजमानपद दरवर्षी प्रत्येक देशाला दिले जाते. यावेळी या बैठकीचे यजमानपद भारताकडे आले आहे. त्यामुळे या वर्षी जी-२० बैठकांसाठीचा लोगो, बैठकांसाठीची मुख्य थीम ठरवण्याची जबाबदारी ही भारताकडेच आहे. या वर्षी भारताने कमळ, पृथ्वीचा समावेश असलेला एक लोगो तयार केला आहे. तसेच ‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ ही या वेळच्या बैठकीची थीम आहे. या लोगोच्या बाजूला भारत, असे नाव लिहिलेले आहे.
भारत सरकारने प्रसिद्ध केलेल्या वृत्त निवेदनानुसार जी-२० च्या लोगोसाठी भारताच्या राष्ट्रध्वजामध्ये असलेल्या पांढरा, केशरी व निळ्या रंगाचा उपयोग करण्यात आलेला आहे. “भारताच्या राष्ट्रीय ध्वजामध्ये असलेल्या रंगांची प्रेरणा घेऊनच जी-२० राष्ट्रगटांच्या परिषदेसाठी लोगो तयार करण्यात आलेला आहे. या लोगोमध्ये पृथ्वी आणि कमळाचे फूलदेखील आहे. सध्या समोर वेगवेगळी आव्हाने असताना या कमळाच्या फुलाच्या माध्यमातून वाढ (ग्रोथ) दर्शवण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. लोगोमध्ये एक पृथ्वी आहे. या पृथ्वीच्या माध्यमातून भारताचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दर्शवण्यात आला आहे. भारताला निसर्गाच्या मदतीने जीवनात शांतता हवी आहे, असे या पृथ्वीच्या माध्यमातून सुचवायचे आहे,” असे या जी-२० ने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात सांगण्यात आले आहे.
गेल्या वर्षी एका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी-२० बैठकीचा लोगो सार्वजनिक केला होता. यावेळी बोलताना “सध्या जगात सगळीकडे संकट, अराजक आहे. अशा काळात भारताकडे जी-२० राष्ट्रगटाचे अध्यक्षपद आले आहे. शतकात एकदा येणाऱ्या करोनासारख्या महासाथीमुळे जग विस्कळित झालेले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी संघर्ष आणि आर्थिक अस्थिरतेची स्थिती निर्माण झाली आहे. अशा काळात लोगोमधील कमळ हे आशेचे प्रतीक असून परिस्थिती कितीही बिकट असू देत कमळ हे फुलतेच. जगात कितीही संकटे असली तरी आपण प्रगती करू शकतो, जगासाठी काहीतरी चांगले देऊ शकतो, हेच या कमळातून प्रतीत होते,” असे मोदी म्हणाले होते.
“भारतीय संस्कृतीत ज्ञान आणि वैभवाची देवी कमळावरच विराजमान झालेली आहे. सध्या देशालाही ज्ञान आणि वैभवाचीच गरज आहे. याच कारणामुळे जी-२० च्या लोगोमध्ये कमाळाचा समावेश आहे,” असेही मोदी म्हणाले होते.
जी-२० च्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीनुसार या वर्षी जी-२० राष्ट्रगटाच्या बैठकीची ‘वसुधैव कुटुंबकम – एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य’ अशी संकल्पना आहे. हे ब्रीद महाउपनिषदातून घेण्यात आले आहे. या थीमच्या माध्यमातून मानव, प्राणी, सूक्ष्म जीवांचे महत्त्व, तसेच त्यांच्यातील परस्परसंबंध सूचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. “भारताने एक सूर्य, एक जग व एक ग्रिड हा मंत्र दिलेला आहे. जगात अक्षय ऊर्जा क्षेत्रात क्रांती व्हावी यासाठी भारताने तशी जगाला हाक दिली होती. भारताने याआधी एक जग, एक आरोग्य, अशी संकल्पना राबवीत जागतिक आरोग्य बळकट करण्याचा प्रयत्न केला होता. आता जी-२० बैठकीच्या माध्यमातून आपण एक पृथ्वी, एक कुटुंब व एक भविष्य, असा मंत्र दिला आहे. भारताच्या या विचारांतून जगाचे कल्याण प्रतीत होते,” असेही तेव्हा मोदी म्हणाले होते.
SL/KA/SL
5 Sept. 2023