गोविंदांच्या विम्यासाठी राज्य सरकारकडून १८ लाख ७५ हजार रु मंजूर
मुंबई, दि. ३० (एमएमसी न्यूज नेटवर्क) : राज्यातील युवकवर्गाचा आवडता दहीहंडी उत्सव जवळ आला असून राज्यभरात गोविंदा पथकांची जोरदार तयारी आणि सराव सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. दहिहंडीला आता खेळाच्या दर्जा मिळाल्यामुळे गोविंदांमध्ये अधिक उत्साह दिसून येत आहे. अशातच गोविंदांसाठी राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचलत मोठी घोषणा केली आहे.विविध ठिकाणी प्रो-गोविंदा स्पर्धांचे आयोजनही करण्यात आलं आहे.या साऱ्या पार्श्वभूमीवर गोविंदांसाठी राज्य सरकारनं एक मोठा निर्णय घेतला आहे. गोविंदांसाठी राज्य सरकारनं 18 लाख 75 हजारांची विमा कवच योजना जाहीर केली आहे. ही योजना 8 सप्टेंबर 2023 पर्यंत लागू राहणार आहे. यासंदर्भातील सर्व प्रक्रियांना मंजूरी देत शासकीय आदेश काढून राज्य सरकारनं यासंदर्भातील आदेश जारी केले आहेत.
गेल्यावर्षी 50 हजार गोविंदांना राज्य सरकारकडून शासकीय विमा कवच देण्यात आलं होतं. पण आता ही संख्या वाढवून 75 हजारांपर्यंत करण्यात आली आहे. म्हणजेच, राज्यभरातील 75 हजार गोविंदांना शासकीय विमा कवच देण्याचे आदेश जारी केले आहेत. गेल्यावर्षीपेक्षा आणखी अतिरिक्त 25 हजार गोविंदांना राज्य सरकारनं विमा कवच दिलं आहे. दहीहंडी उत्सवात मानवी मनोरे तयार करताना दुर्घटना होऊन गोविंदांचा अपघाती मृत्यू होतो किंवा ते जखमी होतात. अशा गोविंदांना आणि त्यांच्या कुटुंबियांना हातभार लावण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीतून आर्थिक सहाय्याची योजना आखण्यात आली आहे.
प्रो-गोविंदा स्पर्धा
2014 पासून प्रो-लीग गोविंदा स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार अशी मागणी होती, ती यंदा पूर्ण होत आहे. वरळी येथे डोम थिएटरमध्ये या स्पर्धेचं आयोजन करण्यात येणार आहे. 31 ऑगस्ट रोजी मुंबई येथील वरळीच्या डोम या ऑडिटोरियममध्ये “प्रो-गोविंदा” स्पर्धेचं आयोजन राज्य समन्वय समितीद्वारा करण्यात येणार आहे, या समितीस शासनाने मान्यता दिली आहे.
SL/KA/SL
30 Aug 2023