जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक

 जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक

बुडापेस्ट,हंगेरी, दि. २८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :

गेल्या वर्षी रौप्य पदकावर समाधान मानाव्या लागणाऱ्या नीरज चोप्राने यंदा जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत भालाफेक खेळात सुवर्णपदक जिंकून नवा इतिहास घडवला आहे. नीरजने बुडापेस्ट येथे झालेल्या जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भालाफेकमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. अंतिम फेरीत त्याने ८८.१७ मी.च्या सर्वोत्तम प्रयत्नाने सुवर्ण यश संपादन केले. ही चॅम्पियनशिप 1983 पासून आयोजित केली जात असून प्रथमच भारतीय खेळाडूने सुवर्णपदक जिंकले आहे. पाकिस्तानच्या अर्शद नदीमने रौप्यपदक जिंकले. त्याने 87.82 मीटर सर्वोत्तम भाला फेकला. अंतिम स्पर्धेत, भारतीय स्टार नीरज चोप्राला त्याचा पाकिस्तानी प्रतिस्पर्धी अर्शद नदीमकडून कठीण आव्हानाचा सामना करावा लागला, मात्र नदीम नीरजला कधीही मागे टाकू शकला नाही.

जागतिक अ‍ॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमधील भारताचे हे एकूण तिसरे पदक आहे. गेल्या मोसमात नीरजने रौप्यपदक जिंकले होते. महिलांची लांब उडीपटू अंजू बॉबी जॉर्जने 20 वर्षांपूर्वी 2003 मध्ये पॅरिसमध्ये कांस्यपदक जिंकले होते.

एकाच वेळी ऑलिम्पिक आणि जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा नीरज हा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. २०२१ च्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याने सुवर्णपदक जिंकले होते. भारत सन 1900 पासून ऑलिम्पिकमध्ये सहभागी होत आहे, परंतु नीरजपूर्वी, कोणत्याही भारतीयाने ट्रॅक आणि फील्ड इव्हेंटमध्ये सुवर्णपदक सोडा, कोणत्याही रंगाचे पदक जिंकले नव्हते. नीरजच्या आधी मिल्खा सिंग आणि पीटी उषा यांची स्वतंत्र ऑलिम्पिकमध्ये चौथे स्थान मिळवणे ही भारताची सर्वोत्तम कामगिरी होती.

या अभूतपूर्व यशाबाबत माध्यमांशी बोलताना नीरज म्हणाला, “मी यापेक्षाही अधिक उंचीवर भाला फेकू शकतो. भालाफेकपटूला काही मर्यादा नसते. त्यामुळे मला अजून मोठी कामगिरी करायची आहे. मी त्यादिशेने प्रयत्न करणार आहे. एक व्यक्ती किती पदके जिंकू शकतो, हे पाहणं प्रेरणादायी ठरणार आहे. पदक जिंकणं म्हणजे आपण सर्वकाही जिंकलं असं होत नाही. अनेक खेळाडू असे आहेत त्यांनी अनेक पदके जिंकली आहेत. त्यामुळे मी आणखी मेहनत घेणार आहे”, असंही नीरज चोप्रा म्हणाला.

SL/KA/SL

28 Aug. 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *