आंबोली जंगलात आढळला काळा बिबट्या
सिंधुदुर्ग, दि. २६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : जिल्ह्यातील आंबोली घाटातील जंगलामध्ये २४ ऑगस्टच्या संध्याकाळी काळ्या बिबट्याचे अर्थात ब्लॅक पँथरचे दर्शन झाले. या परिसरात राहणाऱ्या मिलिंद गडकरी यांना संध्याकाळी फेरफटका मारत असताना या काळ्या बिबट्याचे दर्शन झाले होते. त्यांनी तात्काळ वन विभागाला याबद्दल कळवले आहे.
यापूर्वीही अशा काळ्या बिबट्याच्या नोंदी आंबोलीमध्ये झाल्या आहेत. २०१४ साली कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यामध्ये काळ्या बिबट्याची नोंद झाली होती. तसेच २०१६ मध्ये गोव्याच्या सीमेवरील तिलारीमधूनही काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. काळा बिबट्या हा सामान्य बिबट्यांसारखाच असतो मात्र त्याच्या त्वचेत मेलानिनचे प्रमाण जास्त असल्यामुळे त्वचेचा रंग काळा झालेला पहायला मिळतो. सह्याद्रीमध्ये ब्लॅक पँथर आहेत ही एक सकारात्मक आणि पर्यावरण दृष्ट्या चांगली गोष्ट असल्याचे तज्ञांचे मत आहे.
SL/KA/SL
26 Aug 2023