विधानसभा अध्यक्षांना सादर झाला तब्बल सहा हजार पानांचा खुलासा
मुंबई , दि. 24 (एमएमसी न्यूज नेटवर्क): शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादळाचा एक मोठा अंक सध्या राज्य विधानसभा अध्यक्षांकडे घडत असून शिवसेनेच्या शिंदे गटाच्या सोळा आमदारांनी आज तब्बल सहा हजार पानांचा आपला खुलासा त्यांना सादर केला आहे.
या फुटीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवर सुनावणी घेताना शिंदे गटाच्या सोळा आमदारांना अपात्र ठरविण्याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला होता , त्यानुसार अध्यक्षांनी शिंदे गटाच्या सोळा आणि ठाकरे गटाच्या पंधरा आमदारांना नोटीसा बजावून खुलासा मागितला होता.
त्यानुसार आम्हीच खरी शिवसेना असल्याचा दावा करीत शिंदे गटाच्या सोळा आमदारांनी आज अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे सहा हजार पानांचा खुलासा सादर केला आहे. याशिवाय प्रत्यक्ष सुनावणीच्या वेळी आणखीही पुरावे सादर केले जातील असे मंत्री दीपक केसरकर यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले आहे. यावर प्रतिक्रिया देताना आपण सर्व बाजू तपासून त्यावर योग्य आणि कायदेशीर प्रक्रिया करून निर्णय करू असे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केले आहे.
ML/KA/PGB 24 Aug 2023