भारतीय हॉकी संघ आशियाई करंडकच्या अंतिम फेरीत दाखल
चेन्नई, दि. १२ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : यजमान भारतीय पुरुष हॉकी संघाने शुक्रवारी उपांत्य फेरीच्या लढतीत जपान संघावर ५-० असा दणदणीत विजय साकारला. या विजयासह भारताने आशियाई चॅम्पियन्स करंडक या प्रतिष्ठेच्या हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. कर्णधार हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली तीन वेळच्या चॅम्पियन भारतीय संघाने उपांत्य सामन्यात जपानचा पराभव केला. आकाशदीप (१९ वा मि.), कर्णधार हरमनप्रीत (२३ वा मि.), मनप्रीत सिंग (३६ वा मि.), सुमीत (३९ वा मि.) आणि कार्थीने (५१ वा मि.) यांनी गोल करून भारताचा अंतिम फेरीतील प्रवेश निश्चित केला. या सर्वोत्तम कामगिरी करत मनप्रीत सिंगने हा सामनावीर पुरस्कार पटकावला.
आता भारताला चौथ्यांदा आशियाई चॅम्पियन होण्याची संधी मिळत आहे. यासाठी भारत आणि मलेशिया संघांत आज शनिवारी अंतिम सामना होणार आहे. मलेशियाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला. आता भारतीय संघाने आपल्या घरच्या मैदानावर शेवटच्या मिनिटांपर्यंत वर्चस्व अबाधित ठेवले. यामुळे जपानला शेवटपर्यंत एकही गोल करता आला नाही. यातून जपानचे फायनलचे स्वप्न भंगले.
अझराई (३ रा मि.) जझलान (९, २१ वा मि.), सिल्वेरियस (४७, ४८ वा मि.) आणि सारीने (१९ वा मि.) सरस खेळीतून मलेशिया संघाला शुक्रवारी स्पर्धेच्या फायनलचे तिकीट मिळवून दिले. मलेशिया संघाने विजयी मोहिम कायम ठेवताना अंतिम फेरीचा पल्ला गाठला. आतापर्यंतच्या चार वेळच्या कांस्यपदक विजेत्या मलेशिया संघाने उपांत्य फेरीत दक्षिण कोरियाचा पराभव केला. मलेशिया संघाने ६-२ अशा फरकाने सामना जिंकला. यामुळे गत चॅम्पियन कोरिया संघाचा पराभव झाला. यजमान भारतविरुद्ध पराभवातून सावरलेल्या पाकिस्तान संघाने पाचव्या स्थानासाठीचा सामना जिंकला. पाक संघाने सामन्यात चीनचा पराभव केला. तीन वेळच्या चॅम्पियन पाक संघाने ६-१ ने सामना जिंकला.
SL/KA/SL
12 Aug 2023