विदर्भात तयार झाले पहिले Pink Railway Station

नागपूर, दि. ९ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : रेल्वेच्या प्रशासकीय कामांमध्ये महिलांचा अधिकाधीक सहभाग वाढावा म्हणून विविध पदांवर महिलांना जबाबदारीच्या पदांवर नियुक्त करण्यात येत आहे. सर्व महिला कर्मचाऱ्याद्वारे संचलित असलेल्या नवीन अमरावती रेल्वे स्थानकाला ‘पिंक स्टेशन’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मध्य रेल्वेचे ‘न्यू अमरावती स्थानक’ हे भुसावळ विभागातील असे पहिले पिंक स्थानक आहे.
नवीन अमरावती रेल्वे स्थानकावर लागणा-या सर्व आवश्यक सोयीसुविधा, रेल्वे गाड्यांचे आरक्षण, रेल्वे सुरक्षा बल, रेल्वे पोलीस, संगणक कक्ष, पार्सल सुविधा, स्थानक प्रबंधन, तिकीट निरीक्षक, सफाई कर्मचारी, वाहतूक व्यवस्था सर्वकाही महिला अधिकारी आणि कर्मचारी सांभाळत आहेत.
न्यू अमरावती हे मध्य रेल्वेचे तिसरे पिंक स्थानक आहे. या स्थानकात 4 उप स्टेशन अधीक्षक, 4 पॉइंट वुमन, 3 रेल्वे सुरक्षा कर्मचारी आणि 1 स्टेशन तिकीट बुकिंग एजंट, 12 महिला कर्मचारी कर्मचारी संख्या आहे. या रेल्वे स्थानकात स्थानक प्रबंधक, तिकिट तपासनीस, सफाई कर्मचारी या पदावर महिला कर्मचारी आहेत. तर, हे रेल्वे स्थानक इतर रेल्वे स्थानकापेक्षा हटके दिसण्यासाठी गुलाबी रंगाने रंगविण्यात आले आहे.यासह काही विद्युत दिवे देखील गुलाबी रंगाचे आहेत. त्यामुळे नवीन अमरावती स्थानकाची वेगळी ओळख तयार झाली आहे. स्टेशनवर दररोज अंदाजे 380 प्रवासी येतात तर दररोज 10 ट्रेन चालतात
मुंबई विभागातील माटुंगा स्थानक आणि त्यानंतर नागपूर विभागातील अजनी स्थानक यांचा सर्व कारभार महिलांच्या हाती देऊन यांना पिंक स्थानक म्हणून घोषित करण्यात आले होते. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने रेल्वेने उचललेले हे एक उदाहरण ठरले आहे.
SL/KA/SL
9 Aug 2023