अखेर बेस्ट कंत्राटी कामगारांचा संप मागे

 अखेर बेस्ट कंत्राटी कामगारांचा संप मागे

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या सहा दिवसांपासून विविध मागण्यांसाठी बेस्ट उपक्रमातील कंत्राटी
कामगारांनी पुकारलेला संप अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आंदोलक कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळादरम्यान झालेल्या समाधानकारक चर्चेतून मागे घेण्यात आला.

कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बेस्ट उपक्रमात कायमस्वरूपी सामावून घेणे, कायमस्वरुपी करून घेताना वयाची अट शिथिल करून सर्व प्रवर्गासाठी वय ५० वर्षे करावे, ज्या कंत्राटदार कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी करून घेता येणार नाही, त्यांना समान काम, समान वेतन देणे, वेतनवाढ देणे, बेस्ट बसमधून कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोफत प्रवासाची मुभा देणे आदी मागणीसाठी हा संप पुकारण्यात आला होता.
बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या या संपामुळे गेल्या सहा दिवसांमध्ये प्रवाशांचे हाल झाले. बस थांब्यावर लांबच लांब रांगा दिसून येत होत्या. काही प्रवाशांना रिक्षा, टँक्सीसारख्या अन्य पर्याय निवडावे लागले होते. बेस्ट उपक्रमातील सोमवारी भाडेतत्त्वावरील १,६७१ पैकी ७९६ बस गाड्या प्रवाशांच्या सेवेत येऊ शकल्या नव्हत्या. तर प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी भाडेतत्त्वावरील ६०३ बसगाड्या बेस्ट उपक्रमाच्या चालकांकडून चालवण्यात आल्या होत्या. प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाच्या १५०पैकी १२२ बसही प्रवाशांसाठी उपलब्ध करण्यात आल्या होत्या. याव्यतिरिक्त बेस्ट उपक्रमाच्या स्वमालकीच्या बसगाड्या उपलब्ध होत्या.

अखेर या संपावर तोडगा काढण्यासाठी बेस्टच्या १९ आगारातील कंत्राटी कामगारांनी मिळून एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले. या शिष्टमंडळाने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली.या भेटीदरम्यान मुख्यमंत्री यांनी कर्मचाऱ्यांच्या मागण्या आणि संपाबाबत चर्चा केली. यादरम्यान बेस्टच्या कंत्राटी वाहक आणि चालकांच्या समस्या आणि पागरवाढीच्या मागणीसह इतर मागण्यांवर मार्ग काढण्याचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिल्यानंतर संप मागं घेण्यात आला.

SW/KA/SL

8 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *