मुंबईतील पहिलीच मेट्रो बंद होण्याच्या मार्गावर…

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबईत सुरू झालेली पहिली मेट्रो वाहिनी घाटकोपर ते वर्सोवा ही बंद पडण्याच्या मार्गावर असून ती चालवणारी कंपनी दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहे.
सुमारे दहा वर्षांपूर्वी अनेक कारणाने रखडलेली ही मुंबईतील पहिली वहिली मेट्रो सेवा सुरू करण्यात आली होती. रिलायन्स infrastructure चा ७६ टक्के आणि एमएमआरडीए चा २४ टक्के असा यात वाटा होता. मेट्रो वन असे नाव असलेली ही कंपनी २०१४ पासूनच तोट्यात आहे. अनिल अंबानी यांच्या मालकीच्या या कंपनीने यासाठी मेट्रोचे भाडे वाढविण्याचा प्रयत्न केला होता.मात्र न्यायालयाने नकार दिल्यावर ते शक्य झाले नाही.
या दरम्यान कंपनी स्टेट बँकेसह अनेक बँकांची कर्जे काढली , त्यातील ४१६ कोटी रुपयांच्या कर्जाच्या थकबाकी पोटी स्टेट बँकेने थेट न्यायाधिकरणा कडे दाद मागितली आहे. याच दरम्यान मेट्रो वन कंपनी विरोधात दिवाळखोरीची याचिका दाखल करण्यात आली आहे. ती मंजूर झाल्यास ही मेट्रो सेवाच बंद पडण्याची शक्यता आहे.
ही सेवा बंद पडू दिली जाणार नाही अशी ग्वाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. या मेट्रोच्या उत्पन्न वाढीसाठी भाडेवाढ आणि अन्य पर्यायांचा विचार केला जात आहे. ही कंपनी एमएमआरडीए ने ताब्यात घेऊन चालवावी हा देखील एक पर्याय आहे. त्यादृष्टीेने नेमके काय करता येईल याबाबत राज्य सरकार विचार करीत आहे.
अनिल अंबानी यांच्या मालकीच्या सगळ्या कंपन्या दिवाळखोरीत जात असल्याने राज्य सरकारशी संबंध असलेल्या अनेक प्रकल्पांबाबत मोठी प्रश्नचिन्हे उपस्थित झाली आहेत. राज्य सरकारने विकासासाठी दिलेली पाच विमानतळे अशी रखडली असून आता राज्यभरात मेट्रो चे नवे जाळे पसरले जात असताना मुंबईत सुरू झालेली ही पहिली मेट्रो वाचवण्याची वेळ सरकार वर आली आहे.
ML/KA/SL
8 Aug 2023