पाकचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना अटक

इस्लामाबाद, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि माजी क्रिकेटपटू इम्रान खान यांना तोशाखाना प्रकरणी अटक करण्यात आली आहे. लाहोर पोलिसांनी खान यांना त्यांच्या जमान पार्क येथील घरातून अटक केली. इस्लामाबादच्या ट्रायल कोर्टाने त्यांना 3 वर्षांची शिक्षा सुनावली आहे. तसेच पुढील 5 वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. न्यायालयाने त्यांना एक लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही ठोठावला आहे.
निकालाच्या वेळी न्यायालयाने म्हटले आहे की – तोशाखाना प्रकरणात पीटीआयचे अध्यक्ष इम्रान यांनी पाकिस्तानच्या निवडणूक आयोगाला चुकीची माहिती दिली होती. ते भ्रष्टाचारात गुंतला होते. तोशाखाना प्रकरण दोन प्रकारे सुरू आहे. याबाबत न्यायालयात इम्रान यांची सुनावणी सुरू आहे. याशिवाय, भ्रष्टाचारविरोधी एजन्सी त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना चौकशीसाठी बोलावत आहे, कारण बुशरांनीच तोशाखान्याच्या करोडो रुपयांच्या भेटवस्तू विकल्या होत्या. बुशरा बीबी यांनाही तपास यंत्रणेसमोर हजर व्हावे लागेल. आतापर्यंत तपास यंत्रणेने बुशराला एकूण 13 वेळा हजर राहण्याची नोटीस दिली आहे, मात्र त्या एकदाही हजर झाल्या नाही.
काय आहे तोशाखाना प्रकरण
सत्ताधारी पाकिस्तानी लोकशाही चळवळीने तोशाखाना भेट प्रकरण निवडणूक आयोगासमोर लावून धरले आहे. इम्रान यांनी आपल्या कार्यकाळात विविध देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची विक्री केल्याचे सांगण्यात आले. इम्रान यांनी निवडणूक आयोगाला सांगितले होते की, त्यांनी या सर्व भेटवस्तू तोशाखान्यातून 2.15 कोटी रुपयांना विकत घेतल्या होत्या, त्याची विक्री केल्यावर 5.8 कोटी रुपये मिळाले. नंतर ही रक्कम 20 कोटींहून अधिक असल्याचे उघड झाले.
इम्रान यांना इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती द्यावी, अशी मागणी अबरार खालिद या व्यक्तीने माहिती आयोगात अर्ज दाखल करत केली होती. यावर त्याला भेटवस्तूंचे तपशील दिले जाऊ शकत नाहीत, असे उत्तर मिळाले. त्यामुळे हट्टाला पेटून इस्लामाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
इस्लामाबाद हायकोर्टाने, तुम्ही गिफ्ट्सची माहिती का देत नाही? असा सवाल इम्रान यांना केला असता यांच्या वकिलाने – हे देशाच्या सुरक्षेसाठी धोक्याचे आहे. इतर देशांशी संबंध बिघडू शकतात. म्हणूनच इतर देशांकडून मिळालेल्या भेटवस्तूंची माहिती आम्ही लोकांना देऊ शकत नाही, असे उत्तर दिले होते. त्यामुळे हे प्रकरण अधिकच चिघळत गेले आणि आज अखेर इम्रान खान यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
SL/KA/SL
5 Aug 2023