मुख्यमंत्र्यांनी टोले हाणत उडवली विरोधकांची खिल्ली आणि विचारले महागद्दार कोण…

 मुख्यमंत्र्यांनी टोले हाणत उडवली विरोधकांची खिल्ली आणि विचारले महागद्दार कोण…

मुंबई, दि. ४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्र्यानी उत्तर देताना जोरदार टोले बाजी करत विरोधकांना जोरदार चिमटे काढले. आम्हाला गद्दार म्हणतात पण महा गद्दार कोण असा सवाल त्यांनी केला.विरोधकांच्या बोलण्यात धार नव्हती , विरोधी पक्ष गोंधळलेला दिसला , त्यांचा आत्मविश्वास गेलेला दिसला , अंतिम आठवडा प्रस्तावात विषयांची सरमिसळ दिसून आली असे टोले त्यांनी यावेळी लगावला. बाळासाहेबांच्या विचारांशी , मतदारांशी , शिवसैनिकांशी , पंचवीस वर्षांच्या दोस्त पक्षाशी गद्दारी ज्यांनी केली तोच महा गद्दार असे ते म्हणाले.

राज्यात एक लाख अठरा हजार कोटींची विदेशी गुंतवणूक झाली असून दावोस मध्ये झालेल्या सामंजस्य करारापैकी सत्तर ते ऐशी हजार कोटींच्या गुंतवणुकीवर अमलबजावणी सुरू झाली आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली. विरोधी पक्षाच्या वतीने उपस्थित करण्यात आलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावर ते उत्तर देत होते.खोटं बोला पण रेटून बोला ही विरोधकांची पद्धत आहे, पण आम्ही श्वेतपत्रिका काढली आणि सत्य स्थिती लोकांसमोर आणली आहे. आघाडी सरकारच्या काळात बंद पडलेले राज्यातील सर्व प्रकल्प आम्ही पुन्हा सुरू केले आहेत.

आम्ही तीनशे पासष्ट दिवस चोवीस तास काम करतो , केवळ फेसबुक लाईव्ह करत नाही असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.आम्ही दिल्लीत केंद्र सरकार कडे राज्याच्या हितासाठी जातो , पंतप्रधान मोदी हे आपले पालक आहेत त्यांची कायम मदत आपल्याला मिळते आहे, त्यांच्याकडे जाण्यात चूक काय असा सवाल त्यांनी यावेळी केला. आम्ही सुरू केलेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात आतापर्यंत एक कोटी तेरा लाख लाभार्थी झाले आहेत.

आतापर्यंत केवळ शासन आपल्या घरी एवढंच सुरू होतं असा टोला मुख्यमंत्री यांनी हाणला.राज्यात वीज दर नियंत्रण वीज आयोग करतो तरीही केवळ २.९ टक्के एवढीच दरवाढ आजवर झाली आहे. उद्योगांसाठी बाराशे कोटींची सबसिडी देण्यात आली आहे. सौर ऊर्जेच्या साठी शेतकऱ्यांना हेक्टरी सव्वा लाख इतके भाडे देत आहोत.

आता पर्यंत एक कोटी ६९ लाख शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा फायदा घेतला आहे असं ते यावेळी म्हणाले. सरकारने केवळ आपली पाठ थोपटून घेतली, महागाई वर काहीही उपाययोजना केल्या नाहीत , राज्यातील जनतेला काहीच ठोस मिळालं नाही. जनतेच्या अपेक्षांचा भंग झाला आहे ,त्यांच्या तोंडाला पाने पुसली गेली आहेत असा आरोप करीत विरोधकांनी सभात्याग केला.

ML/KA/SL

5 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *