विनोबांची मानसकन्या, करुणा फुटाणे यांचे निधन

वर्धा, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गोपुरी येथील ग्रामसेवा मंडळाच्या अध्यक्ष करुणा फुटाणे ( वय ६६) ह्यांचे आज त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराने निधन झाले. मूळचे गुजरात येथील सर्वोदयी कार्यकर्ते व परंधाम प्रकाशनाचे व्यवस्थापक दिवंगत रणजीतभाई देसाई आणि बिहार येथील बिंदीबेन यांची एकुलती एक मुलगी असलेल्या करुणाताई आचार्य विनोबा भावे यांच्या मानस कन्या म्हणून गांधीजन परिवारात परिचित होत्या.
पवनार येथील परंधाम आश्रमातच आचार्य विनोबांच्या सान्निध्यात त्यांची जडणघडण झाली. त्यांनी कोणतेही औपचारिक शालेय अथवा महाविद्यालयीन शिक्षण घेतले नसले तरी मराठी, संस्कृत, हिंदी, गुजराती आणि इंग्रजी भाषांमध्ये त्या पारंगत होत्या. विनोबांच्या मार्गदर्शनात त्यांचे कताई, विणाई, गणित, लेखन, प्रूफ रीडिंग, प्रकाशन, शेती, गोपालन अशा अनेक गोष्टींचे प्रशिक्षण झाले होते.
करुणा फुटाणे यांच्या सामाजिक चळवळीतील सहभागाची सुरुवात जयप्रकाश नारायण यांच्या तरूण शांतिसेनापासून झाली.
रवाळा येथील वसंत फुटाणे या ध्येयवादी तरुणाशी विवाहबद्ध झाल्यानंतर नव्वदच्या दशकात त्यांनी सेंद्रिय शेती, पर्यावरणस्नेही जीवनपद्धती, ग्रामीण महिलांचे संघटन, लोकशिक्षणासाठी सार्वजनिक वाचनालय यासारखे अनेक उपक्रम निष्ठेने आणि सार्वजनिक स्तरावर राबविले. रवाळा परिसरातील ग्रामीण महिलांना सोबत घेऊन त्यांनी अनेक वर्षे दारूबंदी आंदोलनही चालविले. २००८ मध्ये ग्रामसेवा मंडळात निर्माण झालेल्या आकस्मिक परिस्थितीमुळे मुले लहान असतानाही कौटुंबिक बाब बाजूला सारून संस्थेच्या हितासाठी ग्रामसेवा मंडळाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. त्यातून खादीक्षेत्रातील तसेच स्थानिक संस्थेसोबत देशविदेशातील इतर संस्था आणि व्यक्तींना जोडण्याचे महत्त्वपूर्ण काम त्यांनी केले.
त्यांच्या मुलाने पाणी फाउंडेशनसोबत जलसंधारण आणि लोकसहभाग यासाठी विदर्भाची जबाबदारी स्वीकारली असताना त्याला वैचारिक आणि संस्थागत बळ देण्याची जबाबदारीही करुणाताईंनी सामाजिक दायित्वाच्या आणि मातृत्वाच्या भावनेतून पार पाडली होती. सेवाग्रामचे आनंद निकेतन, दत्तपूर येथील महारोगी सेवा समिती, मगन संग्रहालय, धरामित्र आदी स्थानिक संस्थांसोबतच राज्यातील अनेक संस्था व संघटनांच्या त्या पदाधिकारी होत्या.
त्यांचे पार्थिव पवनार येथील आश्रमवासी भगिनींना अंत्यदर्शन व्हावे यासाठी परंधाम आश्रमात नेण्यात आले. त्यानंतर दुपारी स्थानिक स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.
ML/KA/SL
3 Aug 2023