राज्यात लाखाहून अधिक लोकांच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग

 राज्यात लाखाहून अधिक लोकांच्या डोळ्यांना जंतुसंसर्ग

मुंबई, दि. २ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेल्या दिड महिन्यापासून राज्यभर कोसळणाऱ्या तुफानी पावसानंतर आता नागरिकांना विविध संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागत आहे. राज्यात सध्या conjunctivitis म्हणजेच डोळे येण्याच्या साथीने 1 लाखांहून अधिक लोकांना ग्रासले आहे. ही साथ झपाट्याने वाढत असल्यामुळे प्रशासनानेही जनतेला डोळ्यांसंबंधी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. हा आजार फार गंभीर स्वरुपाचा मानला जात नाही. पण हा एक संसर्गजन्य आजार असल्यामुळे तथा त्याचा थेट डोळ्यांसारख्या नाजूक अवयवावर परिणाम होत असल्यामुळे तो होणार नाही याची काळजी घेणे फार महत्त्वाचे असते.

डॉक्टरांच्या मते, शाळा, वसतीगृहे, अनाथालय आदी संस्थात्मक ठिकाणी डोळ्यांची साथ आली असेल, तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला विलगीकरणात ठेवावे. डोळे येणे हा एक संसर्गजन्य रोग आहे. त्यामुळे तो एकापासून दुसऱ्याला झपाट्याने होतो. त्यामुळे नियमीत हात धुण्याची गरज आहे. डोळे आल्यानंतर स्टेरॉईड आय ड्रॉपचा वापर टाळावा. रुग्णांनी महापालिकेच्या जवळच्या आरोग्य केंद्र किंवा रुग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत.

महाराष्ट्रात सध्या व्हायरसमुळे डोळ्याचे रुग्ण प्रचंड वाढलेत. पावसाळ्यात आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे व्हायरसला फोफावण्याची पुरती संधी मिळते. ओलाव्यामुळे संसर्ग बराच काळ शरीरात राहतो. त्यामुळे आपल्याला वारंवार घाम येतो. यामुळे आपण सातत्याने स्वतःचा चेहरा पुसत राहतो. असे करताना आपण डोळ्यांनाही हात लावतो. यामुळे आपसूकच संसर्ग होऊन डोळे येतात. 31 जुलैपर्यंतच्या सरकारी आकडेवारीनुसार, सध्या महाराष्ट्रातील जवळपास 1 लाख रुग्ण डोळ्यांच्या आजाराने त्रस्त आहेत.

लक्षणे

conjunctivitis मध्ये मुख्यत: डोळे लाल होणे, डोळ्यांना खाज सुटणे, डोळ्यांना पाणी येणे, डोळ्यांना सूज येणे, डोळ्यांतून चिकट द्रवपदार्थ स्त्रावणे, डोळे जड वाटणे ही लक्षणे दिसून येतात. डॉक्टरांच्या मते, डोळे आल्यानंतर त्याचा परिणाम 3 दिवस राहतो.

घ्यायची काळजी
डोळे स्वच्छ पाण्याने धुणे.
इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपड्याने डोळे पुसू नये.
डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ज्ञाचा सल्ला घ्या.
सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
डॉक्टरांच्या सल्यानेच औषधे डोळ्यात टाकावी.

ML/KA/SL

2 Aug 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *