पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन
पुणे, दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : लोकमान्य टिळक पुरस्कार स्वीकारण्यासाठी आज पुणे येथे आलेल्या नरेंद्र मोदी यांनी पुणे मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केले. आजपासून पुणेकरांच्या सेवेत रुजू झालेल्या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यात दोन मार्गिकांचा समावेश आहे. यात पहिली मार्गिका गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉलपर्यंत तर दुसरी मार्गिका ही फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट अशी आहे. या दोन्ही मार्गिकांवरील मेट्रोने आजपासून पुणेकरांना प्रवास करता येणार आहे. एकूण १३ किलोमीटर लांबीच्या या दोन्ही मार्गिका आहेत.
पिंपरी-चिंचवड आणि पुण्याला जोडणाऱ्या फुगेवाडी ते सिव्हिल कोर्ट आणि रुबी हॉल ते गरवारे या दोन मार्गिका महत्वाच्या मानल्या जातात. मोदींच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या मार्गिकांचं लोकार्पण करण्यात आलं. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील उपस्थित होते. या मेट्रोमुळे पुणेकरांना मोठा फायदा होणार असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
SL/KA/SL
1 Aug 2023