महाराष्ट्र केसरी विजेते अप्पर पोलीस अधीक्षक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज

 महाराष्ट्र केसरी विजेते अप्पर पोलीस अधीक्षक आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी सज्ज

पुणे, दि. १८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्रात केसरी कुस्ती स्पर्धेच्या विजेतेपदावर सलग तीन वेळा मोहर उमटवणारे अप्पर पोलीस अधीक्षक पै. विजय चौधरी हे आता आंतरराष्ट्रीय कुस्ती स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. आगामी वर्ल्ड पोलीस अँड फायर गेम्स स्पर्धेत कुस्तीमध्ये ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ही स्पर्धा २८ जुलै ते ०६ ऑगस्ट या कालावधीत कॅनडा येथील विनिपेग या शहरात होणार आहेत. विजय चौधरी यांनी २०१४,२०१५ आणि २०१६ अशा सलग तीन वर्षामध्ये अतिशय प्रतिष्ठित अशा ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले होते.

जळगावातील सायगाव बगळीचे रहिवासी असलेले चौधरी हे सध्या लाचलुचपत प्रतिबंधक शाखा पुणे विभागात येथे अप्पर पोलिस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आगामी पोलीस खेळांमध्ये ते १२५ किलो वजन गटात खेळणार असून, हिंद केसरी पै .रोहित पटेल यांच्याकडून ते कुस्तीचे प्रशिक्षण घेत आहेत.

या बाबत बोलताना पै.चौधरी म्हणाले , “ आगामी स्पर्धेत कॅनडा, रशिया, अमेरिका, चीन या देशांच्या कुस्तीपटूंचे भारताला मोठे आव्हान असणार आहे. त्यामुळे खेळात चांगली कामगिरी करण्यासाठी मी प्रशिक्षणावर अधिक भर देत आहे. या प्रशिक्षणासाठी मला महाराष्ट्र पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. कात्रज येथील मामासाहेब मोहोळ कुस्ती संकुलात कॅनाडियन टाईम झोन नुसार माझे सध्याच्या घडीला प्रशिक्षण सुरु आहे.”

गेल्या वर्षी २०२२ साली पुण्याच्या वानवडी येथील एस आर पी एफ ग्राऊंड मध्ये झालेल्या ऑल इंडिया पोलिस गेम्स स्पर्धेत चौधरी यांनी सुवर्णपदक जिंकून महाराष्ट्र राज्य पोलीस दलाच्या नावलौकिकात भर घातली होती.

SL/KA/SL
18 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *