देशभरात स्वस्त टोमॅटो विक्री केंद्रे

नवी दिल्ली,दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : गेले काही दिवस शंभरी पार केलेल्या टोमॅटोने सर्वसामान्यांचे गणित बिघडवल्यानंतर आता केंद्र सरकारने याचे दर नियंत्रित करण्यास पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारतर्फे सवलतीच्या दरात विकल्या जात असलेल्या टोमॅटोचे दर रविवारपासून प्रतिकिलो ९० रुपयांऐवजी ८० रुपये करण्यात आले. सरकारने दिल्ली एनसीआर परिसरात शुक्रवारपासून फिरत्या वाहनाद्वारे ९० रुपये किलो दराने नागरिकांना टोमॅटो उपलब्ध करून दिले होते. शनिवारी या योजनेत आणखी काही शहरांचा समावेश करण्यात आला.
याबाबत अधिकृतपणे जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, सरकारने सवलतीच्या दरात टोमॅटोची विक्री सुरू केल्याने टोमॅटोचे दर कमी होत आहेत. देशात अनेक ठिकाणी अशी विक्री केंद्रे सुरू केली आहेत. देशभरातील पाचशेहून अधिक विक्री केंद्रांचा आढावा घेतल्यानंतर रविवार, १६ जुलैपासून सवलतीचा दर ८० रुपये करण्यात आला आहे. रविवारपासून दिल्ली, नोइडा, लखनौ, कानपूर, वाराणसी, पाटणा, मुझफ्फरपूर आणि आरा येथील अनेक केंद्रांवर नाफेड आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघा (एनसीसीएफ )च्या माध्यमातून टोमॅटोची विक्री सुरू केली आहे, असे निवेदनात स्पष्ट केले आहे. देशभरातील ग्राहकांना दिलासा देण्यास कटिबद्ध असल्याचे सरकारने म्हटले आहे.
कमी उत्पादन आणि पाऊस यामुळे देशातील अनेक शहरांत किरकोळ बाजारात टोमॅटोचे दर प्रतिकिलो २५० रुपयांच्या आसपास आहेत. शनिवारी देशात टोमॅटोचे सरासरी दर किलोमागे ११७ रुपये होते, असे सरकारतर्फे सांगण्यात आले. शनिवारी टोमॅटोचा कमाल भाव २५०, तर किमान २५ रुपये किलो होता, असे ग्राहक खात्याच्या आकडेवारीतून दिसते.
दरम्यान सर्वसामान्य ग्राहकांचा विचार करून तातडीने टोमॅटोदर नियंत्रणासाठी पावले उचलणारे सरकार, एरव्ही टोमॅटोचे दर घसरलेले असताना शेतकऱ्यांचे नुकसान होत असताना अशीच तत्परता का दाखवत नाही, असा सवाल शेतकरी नेत्यांकडून विचारला जात आहे.
SL/KA/SL
17 July 2023