पाकीस्तानहून पळून आलेली सीमा आणि तिचा प्रियकर ATS च्या ताब्यात

लखनऊ, दि. १७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : प्रेमाला देशधर्म आणि काळाच्या सीमा नसतात,असे एक आदर्शवादी वाक्य चित्रपटांमधुन ऐकायला मिळते. मात्र जेव्हा एक मुस्लिम विवाहिता आपल्या चार मुलांसह भारताला सतत त्रस्त करणाऱ्या दहशतवाद्यांचा शिरोमणी अशा पाकिस्तानातून गैरमार्गाने भारतात येऊन इथल्या प्रियकरासोबत संसार थाटते तेव्हा हा नक्कीच गंभीर विषय ठरतो. पाकिस्तानातून 4 मुलांसह पळून आलेली सीमा हैदर आणि ग्रेटर नोएडाचा सचिन यांची लव्ह स्टोरी सध्या चर्चेत आहे.3 वर्षांपूर्वी सीमा हैदर आणि सचिन PUBG गेमद्वारे एकमेकांना भेटले होते. त्यानंतर दोघांची मैत्री प्रेमापर्यंत पोहोचली. त्यानंतर सीमा चार मुलांसह रबुपुरा येथील सचिनच्या घरी आली.
याप्रकरणामुळे संतापलेल्या पाकीस्तानी दहशतवाद्यांनी तिथल्या हिंदुंना त्रास देण्यास सुरूवात केली आहे. या प्रकाराची तातडीने दखल घेत उत्तर प्रदेश एटीएसच्या नोएडा युनिटने सीमा हैदरला रबुपुरा गावातून चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तिच्या अटकेची शक्यताही व्यक्त केली जात आहे. सीमासोबत तिची चार मुले, सचिन आणि सचिनचे वडील यांनाही एटीएसने ताब्यात घेतले आहे.
आयबीने सीमा विरोधात माहिती दिली होती. तसेच तिचे काका पाकिस्तानी लष्करात सुभेदार आहेत आणि तिचा भाऊही पाकिस्तानी लष्करात आहे. त्यामुळे तिचा पाकिस्तानी गुप्तचर संस्था ISI शी संबंध असल्याचा संशय आहे. त्यामुळेच एटीएस, आयबी आणि नोएडा पोलिसांसह अनेक एजन्सी या दृष्टीने तपास करत आहेत. सीमा हैदरच्या फोन कॉल डिटेल्सचीही तपासणी केली जात आहे.
दरम्यान, सीमा हैदर आणि सचिन यांच्या प्रेमकहाणीच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानमध्ये एका हिंदू मंदिराची तोडफोड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर नोएडा येथील सीमा हैदरच्या घरी सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. यासोबतच तिला भेटणाऱ्यांवरही बंदी घालण्यात आली आहे. वास्तविक, पाकिस्तानमधील मंदिरावरील हल्ल्यानंतर सोमवारी सकाळी सीमाच्या घराभोवती लोकांची गर्दी जमू लागली. पोलिसांना माहिती मिळताच त्याठिकाणी फौजफाटा तैनात करण्यात आला. सीमा हैदरने सचिनसाठी भारतात येण्याच्या निषेधार्थ या संघटनांनी कृत्य केल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, मॉलसाठी रस्ता तयार करण्यासाठी कराचीतील 150 वर्षे जुने मंदिर पाडण्यात आले आहे. पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक आणि त्यांच्या धार्मिक प्रतिकांवर हल्ले होत असतात, मात्र यावेळी सीमा हैदरच्या बहाण्याने हा हल्ला केला जात आहे.
सीमा हैदरच्या घराकडे जाणारा रस्ताही बंद करण्यात आला आहे. मात्र, ही नियमित तपासणी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. सीमा हैदरच्या हालचाली आणि संपर्कांवर आम्ही सतत लक्ष ठेवून आहोत. याप्रकरणी एटीएस पुन्हा सतर्क झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. आता सगळे सीमावर लक्ष ठेवून आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नोएडाच्या रबुपुरा गावात सीमा हैदरच्या घरी एक इन्स्पेक्टर, 2 महिला आणि पुरुष कॉन्स्टेबल तैनात आहेत. येथे दोन शिफ्टमध्ये पोलिस त्यांच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. बाहेरच्या व्यक्तीला त्यांना भेटू दिले जात नाही. सीमाचे कुटुंबीयही कोणाला भेटत नसल्याचेही सांगितले जात आहे. सीमाची तब्येत खराब असल्याचे सांगून ते लोकांना गेटवरून परत पाठवत आहेत.
यापूर्वी पाकिस्तानच्या एका स्थानिक संघटनेचा व्हिडिओ समोर आला होता. यामध्ये ते सीमाला मुलांसह पाकिस्तानात पाठवण्याची धमकी देत असल्याचे दिसून आले. ते रस्त्याच्या कडेला हातात बंदूक आणि बॉम्ब घेऊन बसलेले दिसले. बंदुका दाखवत ते म्हणत होते की, जर सीमाला परत पाठवले नाही तर त्याचे अत्यंत वाईट परिणाम होतील.
SL/KA/SL
17 July 2023