आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताला २ सुवर्ण, १ रौप्य
बँकाँक, दि. १४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : थायलंडमध्ये सुरू असलेल्या 25 व्या आशियाई अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप 2023 च्या आजच्या तिसऱ्या दिवशी भारतीय खेळाडूंनी तीन पदके जिंकली. तजिंदरपाल सिंग तूर आणि पारुल चौधरी यांनी सुवर्णपदक पटकावले. तर शेलीने रौप्य पदक जिंकले.
आज तिसऱ्या दिवशी भारतासाठी पहिले सुवर्ण तजिंदरपाल सिंग तूरने पुरुषांच्या शॉटपुटमध्ये जिंकले. त्याने 20.23 मीटर लांब गोळा फेकत पहिले स्थान पटकावले. इराणच्या मेहदी साबरीने 19.98 मीटरसह दुसरे स्थान पटकावले, तर कझाकिस्तानच्या इव्हान इवानोव्हने 19.87 मीटरसह तिसरे स्थान पटकावले.
पारुल चौधरीने 3000 मीटर स्टीपल चेस शर्यतीत 9.38.76 सेकंदाची वेळ नोंदवून भारतासाठी दिवसाचे दुसरे सुवर्ण जिंकले. यामध्ये चीनच्या जू शुआंगशुआंगने 9.44.54 सेकंदांसह रौप्यपदक तर जपानच्या रिमी योशिमुराने 9.48.48 सेकंदासह कांस्यपदक पटकावले.
शैली सिंगने लांब उडीत रौप्यपदक पटकावले आहे. तिनं 6.54 मीटर लांब जंप केली. दुसरीकडे जपानच्या शुमारी हाताने 6.97 मीटरसह पहिला क्रमांक पटकावला. चीनच्या झोंगजे ज्वेईने 6.46 मीटर उडी मारून तिसरे स्थान पटकावले.
तजिंदरपाल सिंग तूर आणि पारुल चौधरी यांच्याशिवाय 100 मीटर अडथळा शर्यतीत ज्योती याराजी, 1500 मीटरमध्ये अजय कुमार सरोज आणि तिहेरी उडीत अब्दुल्ला अबुबकर यांनी भारतासाठी सुवर्णपदक जिंकले. तर शैली सिंगने रौप्यपदक पटकावले आहे. ऐश्वर्या मिश्राने 400 मीटर शर्यतीत, तेजस्वीन शंकरने डेकॅथलॉनमध्ये आणि अभिषेक पालने 10 हजार मीटर शर्यतीत कांस्यपदक पटकावले.
या स्पर्धेत आत्तापर्यंत भारताने 5 सुवर्ण पदकांसह 9 पदके जिंकली असून गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
SL/KA/SL
14 July 2023