मंत्रिमंडळ विस्ताराच्या प्रतिक्षेत ताटकळले आमदार
मुंबई, दि. 11 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये उभी फूट पडल्यानंतर त्यातील नऊ जणांना मंत्रिपदाची शपथ दिल्यानंतर मूळ शिवसेना – भाजपा युतीमधील मंत्रिपदाच्या प्रतिक्षेत असणारे इच्छुक आमदार गेले काही दिवस आता होतो की नंतर या मंत्रिमंडळ विस्तारात ताटकळले आहेत.
महाविकास आघाडी सरकार कोसळून नवीन सरकार स्थापन झालेल्याला नुकतेच एक वर्ष पूर्ण झाले आहे. गेले वर्षभर देखील महिला मंत्री नाही , राज्यमंत्री नाही असे आरोप झेलत आज होईल , उद्या होईल या आशेवर दिवस काढणाऱ्या इच्छुकांना दोन जुलैला जोरदार धक्का देत चक्क राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला मंत्रिमंडळात घेतले गेले.
यामुळे आपल्या मंत्रिपदाच्या इच्छेला सुरुंग लागल्याची भावना शिंदे गटामध्ये आणि त्यापेक्षा जास्त भाजपा मध्ये पसरली आहे. मात्र शिंदे गटातील गुडघ्याला बाशिंग बांधून बसलेले बोलून दाखवत आहेत तर भाजपचे लोक तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करत आहेत.
केंद्रातून आलेल्या मोदी – शहा यांच्या आदेशाला आव्हान देण्याची हिंमत कोणाचीच नसून २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने आखलेली ही रणनीती आहे अशी ते स्वतःची समजूत काढून घेत आहेत. हे नेमके काय आहे याचे उत्तर फडणवीस वगळता फारसे कोणालाही माहिती असण्याची शक्यता फारच कमी आहे.
आता मंत्रिमंडळात केवळ चौदा जागा शिल्लक राहिल्या आहेत त्यात तिन्ही पक्षातील आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. आम्हाला किमान सात जागा त्यात मिळतील अशी शिंदे गट आणि भाजपा चे म्हणणे आहे , उर्वरित जागा दोन पक्ष वाटून घेतील असे त्यांना वाटते. गेले चार दिवस राजभवन इथे शपथ विधीची तयारी रोज सुरू असून आयत्यावेळी रोज ती रद्द केली जाते आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्यात गेले दोन दिवस सतत चर्चा सुरू आहेत मात्र केंद्रातून सिग्नल मिळाल्याशिवाय गाडे पुढे सरकण्याची चिन्हे नाहीत. दोन तारखेला शपथविधी झाल्यानंतर तब्बल आठ दिवसांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना आज बंगले आणि दालन वाटप करण्यात आले आहे मात्र खात्यांची अद्याप प्रतिक्षाच आहे. येत्या दोन दिवसांत पावसाळी अधिवेशन सुरू होण्याच्या तोंडावर आणखी मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी अपेक्षा आहे.
ML/KA/PGB
11 July 2023