वंदे भारत सह अनेक रेल्वेंच्या तिकीटात २५% पर्यंत कपात

मुंबई, दि. ८ (एमएमसी न्यूज नेटवर्क) :
वंदे भारतसह इतर सुपरफास्ट एक्स्प्रेसचं तिकीट खूप महागडे आहे त्यामुळे तिकीटांचे दर कमी करण्याची मागणी बऱ्याच दिवसांपासून होत होती. हे लक्षात घेऊन भारतीय रेल्वे तिकिटांच्या किमती कमी करण्यासाठी आणि प्रवाशांसाठी अधिक व्यवहार्य प्रवास बनवण्यासाठी रेल्वेने तिकीट भाड्याच्या कपातीचा निर्णय घेतला आहे.वंदे भारतसह (Vande Bharat) सर्व गाड्यांचे एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास आणि विस्टाडोम कोचचं भाडं 25 टक्क्यांपर्यंत कमी करून रेल्वे मंत्रालयाने प्रवाशांना एक खुशखबर दिली आहे. रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, ही सवलत तात्काळ प्रभावीपणे लागू होणार आहे. अर्थात, ज्यांनी आधीच तिकीट बुक केलं आहे अशा प्रवाशांना भाड्याचा परतावा दिला जाणार नाही.
ट्रेनमध्ये जास्तीत जास्त जागांचं आरक्षण व्हावं, यासाठी भाड्यात कपात केली जाणार असल्याचं रेल्वेनं सांगितलं. रेल्वेचं भाडं आता स्पर्धात्मक पद्धतीने ठरवण्यात येणार आहे. रेल्वेमधील आरामदायी सुविधांचा वापर प्रवाशांना करता यावा, या दृष्टीने रेल्वे मंत्रालयाने हा निर्णय घेतल्याचं म्हटलं आहे. एसी प्रवास सुविधा असलेल्या गाड्यांमध्ये सवलतीच्या दराची योजना लागू करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे.गेल्या 30 दिवसांत ज्या गाड्यांमध्ये 50 टक्क्यांपेक्षा कमी जागा आरक्षित आहे, अशा गाड्यांमध्ये सवलत देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ही सवलत त्वरित प्रभावाने लागू केली जाईल.
ही योजना एसी चेअर कार आणि एक्झिक्युटिव्ह क्लास असणाऱ्या सर्व रेल्वे गाड्यांना लागू होणार आहे. यामध्ये अनुभूती आणि व्हिस्टाडोम कोच असणाऱ्या रेल्वेंसह वंदे भारत एक्स्प्रेसचाही समावेश आहे. या डब्यांमधील प्रवाशांची संख्या वाढवण्यासाठी हा निर्णय घेतला आहे. रेल्वे मंत्रालयाने सांगितल्याप्रमाणे, मूळ भाड्यावर 25 टक्क्यांपर्यंत सूट लागू केली जाणार आहे. आरक्षण शुल्क, सुपर फास्ट अधिभार, जीएसटी सारखे इतर शुल्क स्वतंत्रपणे आकारले जातील.
SL/KA/SL
8 July 2023