उध्दव ठाकरे यांना धक्का देत नीलम गोऱ्हे शिंदे गटात दाखल
मुंबई, दि. ७ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : महाराष्ट्र विधान परिषदेत शिवसेना शिंदे गटाची संख्या वाढण्यासाठी झालेल्या प्रयत्नात त्यांना मोठे यश आले असून उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर त्यांनी विश्वास ठेवत हा प्रवेश केल्याचे सांगितले आहे.
शिवसेनेत फूट पडल्यावर विधानसभेतील चाळीस आमदार त्यांच्यासोबत आले होते मात्र विधान परिषदेच्या एकाही आमदाराने त्यांना पाठिंबा दिला नव्हता , सुरुवातीला विप्लव बाजोरिया , मग मनिषा कायंदे आणि आता उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे असे तीन आमदार आता त्यांच्या गटात दाखल झाले असून उध्दव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे, त्यांची संख्या सभागृहात तीन ने खाली आली असून विरोधी पक्षनेते पद ही गमवावे लागणार आहे.
देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एन डी ए चे चांगले काम सुरू असून अयोध्येतील राम मंदिर, तलाक पीडित महिलांना न्याय , काश्मीर मध्ये ३७० कलम हटविणे आणि समान नागरी कायदा हे त्यातूनच घडत आहे. याशिवाय निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अधिकृत असल्याचा निर्वाळा दिला आहे त्यामुळे आपण शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील युतीत सहभागी होत असल्याचे निवेदन डॉ नीलम गोऱ्हे यांनी प्रसिध्द केले आहे.
डॉ गोऱ्हे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश करीत ,नंतर पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शिवसेना आणि भाजप युती किती मजबूत आहे हे यामुळे पुन्हा सिद्ध झाले आहे असे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले. आपल्याला कामाची संधी दिल्याबद्दल डॉ गोऱ्हे यांनी दिवंगत बाळासाहेब ठाकरे, उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांचे आभार मानले आहेत.
ML/KA/SL
7 July 2023