राष्ट्रपतींचा राज्य शासनाच्यावतीने झाला नागरी सत्कार

 राष्ट्रपतींचा राज्य शासनाच्यावतीने झाला नागरी सत्कार

मुंबई, दि. ७ ( एमएमसी न्यूज नेटवर्क) : समानता आणि भक्तीचा संदेश देणारे ज्ञानेश्वर, नामदेव, एकनाथ तसेच तुकाराम यांसारखे संत, आत्मसन्मान आणि राष्ट्र गौरव वाढवणारे छत्रपती शिवाजी महाराज तसेच महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांसारख्या समाज सुधारकांची भूमी असलेले महाराष्ट्र खरोखरच महान राज्य आहे सांगून समाजाच्या शेवटच्या घटकासाठी कार्य करण्याची जाणीव राज्याकडून यापुढेही जपली जावी अशी अपेक्षा राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी काल व्यक्त केली.

राष्ट्रपतीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर महाराष्ट्रातील प्रथम आगमनानिमित्त द्रौपदी मुर्मू यांचा महाराष्ट्र शासनाच्या वतीने काल गुरुवारी (दि. ६) राजभवन येथे नागरी सत्कार करण्यात आला, त्यावेळी त्या बोलत होत्या.

कार्यक्रमाला राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय सामाजिक न्याय , सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, उपसभापती नीलम गोर्हे, राज्यमंत्रिमंडळातील अनेक मंत्री, माजी मुख्यमंत्री सुशील कुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, गायिका आशा भोसले, उद्योजिका राजश्री बिर्ला आदी उपस्थित होते.

आपल्या भाषणाची सुरुवात मराठीतून करताना राष्ट्रपती मुर्मू यांनी महाराष्ट्राचे देशाच्या स्वातंत्र्य लढ्यातील, आर्थिक आणि सामाजिक विकासातील तसेच संगीत व लोककला क्षेत्रातील योगदानाचे कौतुक केले.

यावेळी त्यांनी लोकमान्य टिळक यांच्या ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ या स्वातंत्र्याच्या मंत्राचे स्मरण केले. राष्ट्रपतींनी आपल्या भाषणातून संगीत क्षेत्रातील पं. भातखंडे, पलुस्कर यांच्यापासून किशोरी आमोणकर , भारतरत्न लता मंगेशकर यांच्या योगदानाचा देखील उल्लेख केला.

स्वातंत्र्याच्या अमृत काळात द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती लाभणे भाग्य

द्रौपदी मुर्मू यांचा झारखंड राज्याच्या राज्यपाल पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर त्या राज्याचा राज्यपाल म्हणून काम करण्याचे भाग्य आपणास लाभले असे नमूद करून द्रौपदी मुर्मू राज्यपालांच्या परिषदेत करीत असलेल्या सूचना राष्ट्रपतींसह सर्वांकडून गांभीर्याने घेतल्या जात, अशी आठवण राज्यपाल रमेश बैस यांनी यावेळी सांगितली.

देश स्वातंत्र्याचा अमृतकाळ तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचे ३५० वे वर्ष साजरे करीत असताना द्रौपदी मुर्मू यांसारखे साधे व निरलस व्यक्तिमत्व राष्ट्रपती म्हणून लाभणे हे देशाचे भाग्य असल्याचे राज्यपालांनी सांगितले.

द्रौपदी मुर्मू शून्यातून विश्व निर्माण करणारे व्यक्तित्व

शिक्षक, नगरसेविका, आमदार, मंत्री, राज्यपाल म्हणून काम केलेल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे व्यक्तित्व शून्यातून विश्व निर्माण करणारे असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी काढले.

द्रौपदी मुर्मू या स्वातंत्र्योत्तर काळात जन्मलेल्या पहिल्या राष्ट्रपती असून अनेक विक्रम त्यांच्या नावावर आहेत, असे सांगून वंचित आदिवासी तसेच आदिम जनजातींप्रती त्यांची संवेदना स्पृहणीय आहे असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केले. द्रौपदी मुर्मू यांचे जीवन अतिशय संघर्षमय होते. मुर्मू यांनी कठीण परिस्थितीत शिक्षण पूर्ण केले व त्यानंतर जास्तीत जास्त लोकांना शिक्षण घेण्यासाठी प्रेरित केले असे त्यांनी सांगितले.

सुरुवातीला राज्यपालांनी राष्ट्रपतींचा शाल आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार केला. त्यानंतर मुख्यमंत्री , उपमुख्यमंत्री यांनी राष्ट्रपतींना गणेशाची आणि छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट दिली. सांस्कृतिक कार्यक्रमानंतर राज्यपालांनी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ स्नेहभोजन आयोजित केले होते. स्नेहभोजनाला राज्य मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि निमंत्रित मान्यवर उपस्थित होते.

ML/KA/SL

7 July 2023

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *