कोकणातील कासव पोहोचले श्रीलंकेत
मुंबई, दि. ६ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : कोकण किनारपट्टीवर विशेषत:रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर गेल्या अनेक वर्षांपासून ऑलिव्ह रिडले या जातीच्या कासवांची उत्तम जोपासना केली जाते. विणीच्या हंगामात समुद्रकिनाऱ्यावर येऊन अंडी घालून कासवे पुन्हा समुद्रात निघून जातात. अंड्यातून पिल्ल बाहेर येऊन ती समुद्रात सुरक्षित प्रवेश करे पर्यंत पर्यावरण प्रेमी या पिल्लांची निगुतीने काळजी घेतात. यामध्ये कासवांची जीवनशैली आणि त्यांचा प्रवास यांचाही अभ्यास केला जातो. अशाच एका अभ्यासांतर्गत गुहागरच्या किनाऱ्यावर उपग्रह टॅग केलेल्या ‘बागेश्री’ या ऑलिव्ह रिडले कासवाने अवघ्या चार महिन्यात श्रीलंकेची किनारपट्टी गाठली आहे. गुहागर ते कन्याकुमारीअसा प्रवास करुन ती श्रीलंकेच्या पाण्यात उतरली आहे.
भारतीय वन्यजीव संस्थेची चमू, मँग्रोव्ह फाउंडेशनचे सदस्य व महाराष्ट्र वनविभागाच्या रत्नागिरी विभागाच्या पथकाने २१ फेब्रुवारीला गुहागर समुद्रकिनाऱ्यावर गस्त घातली. या समुद्रकिनाऱ्यावर घरटी बांधण्यासाठी आलेल्या दोन मादी ऑलिव्ह रिडले कासवांची घरटी बांधून झाल्यानंतर २२ फेब्रुवारीला त्यांना सॅटेलाईट टॅग बसवण्यात आले. ‘बागेश्री’ व ‘गुहा’ अशी नावे देण्यात आलेल्या दोन्ही मादी कासवांना २३ फेब्रुवारीला समुद्रात परत सोडण्यात आले. महाराष्ट्राच्या किनारपट्टीवर ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची तुरळक घरटी आहेत. आत्तापर्यंत, ऑलिव्ह रिडले फक्त पूर्व किनारपट्टीवर टॅग केले गेले आहेत.
भारताच्या पश्चिम किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडलेजचा हा पहिला उपग्रह टॅगिंग प्रकल्प आहे. या अभ्यासामुळे पश्चिम भारताच्या किनाऱ्यावरील ऑलिव्ह रिडले समुद्री कासवांची हालचाल समजण्यास मदत होईल. सोबतच टॅग करण्यात आलेले ‘गुहा’ हे मादी ऑलिव्ह रिडले कासव लक्षद्वीपपर्यंत जाऊन परत आले आणि आता ते कर्नाटक किनाऱ्याच्या आसपास आहे.
SL/KA/SL
6 July 2023