या देशात ब्युटी पार्लर्स बंद करण्याचा आदेश
काबुल, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : तालिबान या जाचक राजवटीने २०२१ मध्ये भारताचा मित्र देश असलेल्या अफगाणिस्तानाचा ताबा घेतला. यामुळे देशाची अर्थव्यवस्था रसातळाला गेली आहे. त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्ती विशेषत:स्त्रियांचे दैनंदिन आयुष्य कठीण होऊन बसे आहे. अफगाणिस्तान सरकारवर ताबा मिळवणाऱ्या तालिबान या दहशतवादी संघटनेने आता देशातील सर्व ब्युटी पार्लर बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलांना एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. मात्र, या बंदीचे कारण सांगण्यात आलेले नाही.
15 ऑगस्ट 2021 रोजी तालिबानने काबुलसह संपूर्ण अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तेव्हापासून त्यांनी मुली आणि महिलांचे शिक्षण आणि नोकऱ्यांशी संबंधित सर्व अधिकार काढून घेतले आहेत. अलीकडेच तालिबानने एका आदेशात म्हटले होते की, यूएनशी संबंधित एनजीओमध्ये महिलांना काम करता येणार नाही. यानंतर सरकारी नोकऱ्यांमधील उरलेल्या महिलांनाही अत्यंत गुप्तपणे नोकरीवरून काढून टाकण्यात आले.तालिबान सरकारने लेटर हेडवर ब्युटी पार्लर बंद करण्याचा आदेश जारी केला आहे. त्यावर सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुंदजादा यांची स्वाक्षरी आहे.
तालिबानच्या जाचक निर्णयाबाबत काबुलमधील ब्युटी पार्लरच्या व्यवस्थापकेने मांडलेले मत तेथील स्त्रीयांची दयनीय स्थिती स्पष्ट करते.त्या म्हणतात, “तालिबानने महिलांना अफगाणिस्तानातून बाहेर काढले असते तर बरे झाले असते. त्यांचे अस्तित्वच संपले असते. आता मरण बरे. आपण अफगाणिस्तानात जन्म घेतला नसता तर बरे झाले असते.”
तालिबानने मुलींच्या सर्व प्रकारच्या शिक्षणावर बंदी घातली आहे. कोणत्याही वयोगटातील मुलींना शिकवू नका, असे शिक्षकांना सांगण्यात आले आहे. मशिदींमध्ये प्रौढ महिलांच्या प्रवेशावरही बंदी घालण्यात आली आहे. 2001 मध्ये अमेरिकेच्या हस्तक्षेपानंतर तालिबानला सत्तेवरून हटवल्यानंतर महिलांच्या स्थितीत सुधारणा होऊ लागली होती. महिलांना मूलभूत हक्क मिळू लागले होते. मात्र अमेरिकन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतल्यावर तालिबान्यांच्या जाचक राजवटीने पुन्हा उटल खाल्ली असून सर्वसामान्य नागरिक यामध्ये भरडून निघाला आहे.
SL/KA/SL
5 July 2023