राष्ट्रवादीचे नाव आणि पक्षचिन्ह द्या
मुंबई, दि. ५ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : एकनाथ शिंदे यांनी वर्षभरापूर्वी केलेल्या बंडाची पुनरावृत्ती करत राष्ट्रवादीचे अजित दादा पवार दोन दिवसांपूर्वीच पक्षातून वेगळे होण्याचा निर्णय घेत सरकारमध्ये सामिल झाले आहेत. त्यानंतर या राजकीय नाट्याचे विविध प्रवेश पाहून सर्वसामान्य जनता चक्रावून गेली आहे. द अजित पवारांनी बंडखोरीनंतर लगेचच उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊन शिवसेना-भाजप सरकारला पाठिंबा दिला.आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नाव व पक्षचिन्हावर दावा सांगितला. तसेच निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल करून या राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव व घड्याळ या पक्षचिन्हाची मागणी केली आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावर दावा केला आहे. तर दुसरीकडे, शरद पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवारांसह 9 आमदारांना अपात्र घोषित करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही आमची बाजू ऐकून घेतल्याशिवाय अजित पवार गटाच्या अर्जावर कोणताही निर्णय घेऊ नये, अशी मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे. तसेच बंडखोर आमदारांविरोधात अपात्रतेची कारवाई सुरू असल्याचीही माहिती जयंत पाटलांनी आयोगाला दिली.
अजित पवार गटाने ३० जून २०२३ रोजी मंजूर केलेला ठराव निवडणूक आयोगात सादर केला आहे. तसेच प्रतिज्ञापत्रही सादर करण्यात आलं. यानुसार राष्ट्रवादीच्या विधीमंडळातील सदस्य आणि संघटनात्मक पदाधिकाऱ्यांनी बहुमताने अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदी निवड केली आहे. प्रफुल पटेल यांचं कार्यकारी अध्यक्षपद तसंच ठेवण्यात आलं आहे. याशिवाय राष्ट्रवादी पक्षाच्या आमदारांनी बहुमताने अजित पवारांना विधीमंडळ नेता म्हणूनही निवडल्याचा दावा करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अजित पवार व शरद पवार या दोन्ही गटांनी बुधवारी मुंबईत जोरदार शक्तीप्रदर्शन केले. अजित पवारांच्या गटाच्या मेळाव्याला राष्ट्रवादीचे 30 हून अधिक आमदार उपस्थित होते. तर शरद पवारांच्या बैठकीला 15 हून अधिक आमदारांची हजेरी होती.दरम्यान तासातासाला बदलणाऱ्या या राजकीय नाट्यामध्ये आता पुढे काय घडणार याकडे मतदार हतबलपणे पाहत आहे.
SL/KA/SL
5 July 2023