कठोर अटी लादून IMF ने पाकला दिले कर्ज

इस्लामाबाद, दि. ३ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पाकीस्तानची अर्थव्यवस्था सध्या मोठ्या गर्तेत अडकली आहे. अन्नधान्यांच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे पाकमधील सामान्य नागरीक हवालदिल झाला आहे. अखेर या आर्थिक दिवाळखोरीतून सावरण्यासाठी आंतरराष्ट्रीय नाणे निधीने नुकतेच पाकला 3 अब्ज डॉलरचे कर्ज देण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. या कर्जाबदल्यात IMFने अनेक कठोर अटी घातल्या आहेत.दरम्यान या हलाखीच्या स्थितीत एरवी पाकची मखलाशी करणाऱ्या चीनने मात्र सोईस्कर मौन धारण केले आहे,
जून महिन्यात पाकिस्तान सरकारने 50.45 अब्ज डॉलरचा अर्थसंकल्प सादर केला होता. पाकिस्तान सरकारने 2024 या आर्थिक वर्षासाठी एकूण खर्च (खर्च) 13.32 लाख कोटी रुपये ठेवला होता. यातील 55% रक्कम कर्जाची परतफेड आणि व्याजावर खर्च केली जाईल. म्हणजेच कर्जाची परतफेड करण्यासाठी सुमारे 7.3 लाख कोटी रुपये खर्च होणार आहेत. सरकारने पुढील वर्षासाठी महागाई दर 21 टक्क्यांच्या खाली ठेवण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. मंत्री इशाक दार यांनी सांगितले होते की, नवीन अर्थसंकल्पात कोणताही नवीन कर लादण्यात आलेला नाही. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे IMF नाराज झाला आहे.
IMF ने लादलेल्या अटी पूर्ण करण्यासाठी पाक सरकारला काही कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. यामुळे जनसामान्यांचे जीवन अधिकच समस्याग्रस्त होणार आहे. सरकारला तातडीने सर्व प्रकारच्या सबसिडी रद्द कराव्या लागतील. पेट्रोल-डिझेल आणि वीज 30% महाग करावी लागेल.तसेच कर संकलन 10% वाढवावे लागेल. आयएमएफने कर्जाबाबत लादलेल्या कठोर अटींची पूर्तता करणे शाहबाज सरकारसाठी अत्यंत कठीण जाईल. याचे सर्वात मोठे कारण राजकीय आहे.ऑक्टोबरमध्ये सार्वत्रिक निवडणुका होणार आहेत आणि सरकारने या अटी मान्य केल्या तर सत्तेत परतणे फार कठीण होईल. कारण या अटी पूर्ण करणे म्हणजे सामान्य जनतेवर प्रचंड बोजा लादणे होय.
एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या अहवालानुसार- IMF ने 3 अब्ज डॉलर्स कर्ज दिले आहे, परंतु पाकिस्तानला या वर्षी नोव्हेंबरपर्यंत 23 अब्ज डॉलर्स कर्जाची परतफेड करायची आहे आणि त्यातील एक मोठा भाग फक्त व्याज आहे. साहजिकच मूळ रक्कम त्याच्या जागी राहील. जुलैअखेर सरकारच्या तिजोरीत 15 अब्ज डॉलर्स जमा होतील, असा दावा अर्थमंत्री इशाक दार करत आहेत. हे जरी खरे असले तरी निवडणुकीपूर्वी कर्जाचे हप्ते फेडण्याचे आणि महागाई कमी करण्याचे काम सरकारला साध्य होईल असे सध्या तरी दिसत नाही.
IMF प्रमुखांनी पाकला सुनावले
फेब्रुवारीमध्ये पाकिस्तान डिफॉल्टच्या मार्गावर होता. त्याचवेळी अर्थमंत्री दार यांनी निवेदन दिले. म्हणाले- आम्ही आमचे निर्णय स्वतः घेऊ. IMF आम्हाला डिक्टेशन देऊ शकत नाही.यानंतर आयएमएफच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टालिना जॉर्जिएवा म्हणाल्या – सर्वप्रथम पाकिस्तानला एका देशाप्रमाणे वागायला शिकले पाहिजे. केवळ कर्जाच्या जोरावरच व्यवस्था चालवणारा पाकिस्तान अशी धोकादायक जागा बनत चालला आहे. प्रश्न असा आहे की IMF तुम्हाला कर्ज देते, पण तुम्ही ते अशा प्रकारे वापरता की त्याचा फायदा गरीबांच्या कल्याणाऐवजी देशातील श्रीमंतांना होतो. त्यावर सध्या 123 अब्ज डॉलरचे कर्ज आहे. महागाईचा दर 40 टक्क्यांच्या पुढे गेला आहे.
SL/KA/SL
3 July 2023