सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात तिप्पटीने वाढ
नवी दिल्ली,दि. १ (एमएमसी न्यूज नेटवर्क): अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सार्वजनीक बँकांच्या प्रगतीबाबत मोठी घोषणा केली आहे. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या नफ्यात तिपटीने वाढ झाल्याचे अर्थमंत्र्यांनी म्हटले आहे. त्याचबरोबर त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेतील बँका आणि कॉर्पोरेट्सच्या ‘ट्विन बॅलन्स शीट’ची समस्या दूर झाल्याचेही स्पष्ट केले आहे. मोदी सरकारच्या एकत्रित प्रयत्नांमुळे ‘ट्विन बॅलन्स शीट’चे फायदे आता मिळत आहेत,असेही अर्थमंत्र्यांनी नमुद केले.नवी दिल्ली येथे पंजाब आणि सिंध बँकेच्या कॉर्पोरेट कार्यालयाच्या उद्घाटन कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली. त्या पुढे म्हणाल्या की सार्वजनिक क्षेत्रातील बँकांचा नफा २०२२-२३ मध्ये १.०४ लाख कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे, जो २०१४ च्या तुलनेत तिप्पट आहे.
‘ट्विन-बॅलन्स शीट’ समस्या म्हणजे बँका आणि कॉर्पोरेट्सची आर्थिक बाजू एकाच वेळी खालावत जाणे. या स्थितीत कर्जदार आणि कर्ज देणारे दोघेही तणावाखाली असतात. दुसरीकडे, कर्जदार परतफेड करण्याच्या स्थितीत असल्यास, ती ‘ट्विन-बॅलन्स शीट’ फायदेशीर आहे. निर्मला सीतारामन म्हणाल्या, “मला सांगायला आनंद होत आहे की सरकारच्या विविध उपक्रमांमुळे ट्विन-बॅलन्स शीटचा प्रश्न सुटला आहे. आता भारतीय अर्थव्यवस्थेला ट्विन-बॅलन्स शीटचा फायदा होत असल्याचे रिझर्व्ह बँकेचे मत आहे.
मोदी सरकारच्या विविध उपक्रमांमुळे मालमत्तेवर परतावा, निव्वळ व्याज मार्जिन आणि प्रोव्हिजन कव्हरेज रेशो यासारख्या सर्व महत्त्वाच्या पॅरामीटर्समध्ये सुधारणा झाली आहे, असेही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले.
SL/KA/SL
1 July 2023