विजेच्या धक्क्याने १० शेळ्या मृत्युमुखी.

जालना, दि. 27 (एमएमसी न्यूज नेटवर्क): महावितरणच्या गुत्तेदाराने निष्काळजीपणा करीत गावठाण डीपीचे काम वेळेत केले नाही,परिणामी या अर्धवट कामामुळे जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक विद्युत प्रवाह उतरल्याने विद्युत धक्का लागून दहा शेळ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना काल जालना जिल्ह्याच्या बदनापूर तालुक्यातील दावलवाडी शिवारात घडली आहे.या घटनेमुळे संबंधित पशुपालकाचे मोठे नुकसान झाले आहे.10 goats died due to lightning.
बदनापूर तालुक्यातील दावलवाडी येथे एका गावठाण डीपीचे काम सुरू आहे. याकरिता विद्युत खांब उभा करण्यात आले आहेत व तारा जमिनीवर पडलेल्या आहेत.गावातील शिवाजी विठ्ठल गायकवाड यांच्या दहा बकऱ्या मंगळवारी सकाळी गावातच चरत होत्या. त्यावेळी जमिनीवर पडलेल्या तारांमध्ये अचानक वीज प्रवाह आला आणि विद्युत धक्का लागल्याने दहा शेळ्यांचा जागीच मृत्यू झाला. गायकवाड हे भूमिहीन असून, शेळी पालनावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. परंतू अचानक झालेल्या या घटनेमुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. गायकवाड यांनी बदनापूर ठाण्यात तक्रार दिली आहे त्यात वीज वितरण कंपनी व गुत्तेदाराच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडल्याचे त्यांनी म्हटले आहे.गावठाण डीपीचे काम लवकर करण्यासाठी संबंधितांकडे आम्ही अनेकवेळा पाठपुरावा केला,परंतु हे काम लवकर झाले नाही आणि ही घटना घडली. आता महावितरणने तातडीने गायकवाड यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
ML/KA/PGB
27 Jun 2023