दीर्घ प्रतिक्षेनंतर राज्यभर धो धो पाऊस, या दिवशी ऑरेंज अलर्ट
मुंबई, दि. २४ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : पंधरा दिवस लोकांना चातकासारखी वाट पहायला लावून आज अखेर वरुणराज राज्यभर सक्रिय झाले आहेत. विशेष म्हणजे कालपर्यंत उन्हाच्या झळांनी होरपळणारा महाराष्ट्र आज सकाळपासून सुरू झालेल्या संततधारेने सुखावला आहे. पण या एकाच दिवसात धोधो बरसलेल्या सरींमुळे हवामान विभागाने मुंबईसह १३ जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळे फक्त एकाच दिवसात उन्हाळ्यातून पावसाळ्यात उडी घेतलेल्या निसर्गाचे रौद्र रूप पुन्हा एकदा प्रत्ययास आले आहे.
येत्या ३ ते ४ तासात नाशिक, सांगली, सोलापूर, औरंगाबाद, बीड या शहरांमध्येही मुसळधार पाऊस होईल, असा इशारा मुंबई आयएमडीकडून देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना खबरदारी घ्यावी, अशा सूचना हवामान खात्याकडून देण्यात आल्या आहेत.
यासोबतच पुढील ३-४ तासांत रायगड, सिंधुदुर्ग, सातारा जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम ते तीव्र स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
हवामान खात्याच्या अंदाजानुसार, महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र, विदर्भ मराठवाडा आणि कोकणात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण किनारपट्टीवर जोरदार वारे वाहणार असल्याने मच्छिमारांनी समुद्रात जाऊ नये, असा सल्ला हवामान खात्याने दिला आहे. तर आजपासून राज्यात पावसाचा जोर वाढणार असून मराठवाड्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस अपेक्षित आहे.
SL/KA/SL
24 June 2023