BCCI वर संतापले सुनिल गावस्कर
नवी दिल्ली: जुलै महिन्यात भारताचा संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर जात आहे.बीसीसीआयने कसोटी आणि वनडे मालिकेसाठी घोषणा केली आहे. या दौऱ्याची सुरुवात दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेने होणार आहे. त्यानंतर या दौऱ्यात ३ सामन्यांची वनडे तर ५ सामन्यांची टी-२० मालिका होणार आहे. संघ घोषणेनंतर सर्वाधिक चर्चा आहे ती अनुभवी क्रिकेटपटू चेतेश्वर पुजार याला संघातून वगळण्यात आल्याची. या वरुनच सुनिल गावसकर यांनी BCCI वर नाराजी व्यक्त केली आहे.
पुजाराच्या जागी यशस्वी जयसवाल याला संघात स्थान देण्यात आले असून तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्याची शक्यता आहे. गेल्या दशकापासून पुजारा कसोटी संघात तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करत होता. भारतीय संघातील पुजारा वगळता अन्य कोणताही मोठा बदल दिसला नाही. दरम्यान पुजाराने आता एक व्हिडिओ शेअर करत भारताच्या निवड समितीला चोख उत्तर दिलं आहे.त्याचा हा व्हिडीओला सोशल मिडियावर चांगलाच गाजत असून चाहते त्याच्या बाजूने बोलत असल्याचे दिसत आहे.
भारतीय संघाची निवड आणि पुजाराला वगळण्यात आल्यानंतर माजी कर्णधार व दिग्गज फलंदाज सुनील गावसकर यांनी जोरदार टीका केली आहे. निवड समितीसमोर अनेक मोठ्या स्टार खेळाडूंना विश्रांती देऊन युवा खेळाडूंना संघात स्थान देण्याची संधी होती. पण तसे केले नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधील फलंदाजीच्या खराब कामगिरीसाठी बळीचा बकरा पुजाराला करण्यात आल्याचे गावसकर म्हणाले.
आमची (भारताची) फलंदाजी खराब झाली त्यासाठी बळीचा बकरा का केला गेला. तो भारतीय क्रिकेटचा एक प्रामाणिक खेळाडू आहे. शांत आणि संयमी आहे. त्याचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स नाहीत जो आवज उठवतील. म्हणून तुम्ही त्याला संघाबाहेर कराल का? हे समजण्यापलीकडे आहे, अशा शब्दांत गावसकरांनी यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आजकाल निवड समितीला प्रश्न विचारता येत नाही. निवड समिती पत्रकार परिषद घेऊन संघाची घोषणा करत नाहीत. निवड समितीला संघाचा पराभव अथवा खेळाडूंचा अपयशाबद्दल प्रश्न विचारले जात नाहीत. मला वाटत नाही की आजकल निवड समितीच्या अध्यक्षांनी कोणा माध्यम प्रतिनिधींशी चर्चा केली असेल, असेही गावसकरांनी नमूद केले आहे.
पुजारा भारतासाठी फक्त कसोटी खेळतो. गेल्या वर्षाच्या सुरुवातीला त्याला संघातून वगळण्यात आले होते. त्यानंतर काउंटी क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी केल्याने पुन्हा संघात स्थान मिळाले. WTC फायनलमध्ये मात्र त्याला १४ आणि २७ धावा करता आल्या. फायनलमध्ये रोहित शर्मा, शुभमन गिल आणि विराट कोहली यांना देखील धावा करता आल्या नाहीत. तरी ते संघात आहेत.
SL/KA/SL
24 June 2023