कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी ED चे मुंबईभर छापे

मुंबई, दि. २१ (एमएमसी न्यूज नेटवर्क) : मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) आज मुंबईत १६ हून अधिक ठिकाणी छापेमारी केल्याचे समोर येत आहे. ठाकरे गटाचे सचिव सूरज चव्हाण, मुंबई महापालिकेचे तत्कालीन अतिरिक्त आयुक्त संजीव जैस्वाल, तसेच संजय राऊतांचे व्यवसायिक पार्टनर सुजित पाटकर यांच्या घरी ईडीने छापेमारी केली. आज सकाळी 8 वाजेपासून कोविड सेंटर घोटाळासंबंधी मुंबईत अनेक ठिकाणी ईडीने एकाचवेळी छापेमारीला सुरूवात केली. विशेषकरून माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या निकटवर्तीयांवर ईडीची ही छापेमारी सुरू असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी विशेष बाब म्हणजे सोमवारीच (दि. १९) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई महापालिकेत १२ हजार ५०० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप केला होता. तत्कालीन मविआ सरकार हे घोटाळेबाज सरकार होते, असा आरोप करत हे सरकार भ्रष्टाचाराचा एक-एक पैसा वसूल करेल, असे फडणवीस म्हणाले होते. कॅगच्या अहवालातून मुंबई महापालिकेचा हा घोटाळा समोर आल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही म्हटले आहे. तसेच, मुंबई महापालिकेच्या या घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी शिंदे सरकारने एसआयटीचीही स्थापना केली आहे.
दरम्यान आज झालेल्या ईडीच्या छाप्यांविषयी राज्याचे गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. आज त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.“नेमकी काय कारवाई सुरू आहे हे मला माहिती नाही. पण निश्चितपणे सांगतो की ज्यावेळेस मुंबई महानगरपालिकेमध्ये कोविड सेंटर्स सुरू करण्यात आले. त्यानंतर कोविड सेंटरमधील घोटाळा बाहेर आला, त्यावेळी अतिशय धक्कादायक माहिती बाहेर आली होती. कोणताही अनुभव नसलेल्या कंपन्या तयार झाल्या होत्या. लोकांच्या जिवाशी अक्षरशः खेळण्यात आलं. पुण्यात तर एका पत्रकाराचाच मृत्यू झाला. त्यामुळे यासंदर्भातील चौकशी चालली आहे. ही चौकशी कुठपर्यंत पोहोचली, या छाप्यात काय मिळालं आहे हे ईडी सांगू शकेल. मला माहिती नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
मुंबई महापालिकेच्या कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी सुजीत पाटकर यांच्यासह आणखी तिघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी याप्रकरणी ३८ कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली असून त्यांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी ईडीने हे छापे मारले आहेत. याप्रकरणी लाईफ लाईन रुग्णालयाच्या व्यवस्थापन सेवेसह डॉ हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा आणि राजू साळुंखे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण पुढील तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले होते.
SL/KA/SL
21 June 2023