मयत आणि स्थलांतरित यामुळे घटतो मतदानाचा टक्का

 मयत आणि स्थलांतरित यामुळे घटतो मतदानाचा टक्का

मुंबई, दि. 20 (एमएमसी न्यूज नेटवर्क): राज्यातील मतदार यादीत मयत आणि स्थलांतरित यांचे प्रमाण मोठे असल्याने राज्यातील मतदानाचा टक्का हा कायम घटलेलाच दिसतो. राष्ट्रीय पातळीवर असणारा मतदानाचा टक्का आपल्या राज्यात नाही त्यामुळे तो वाढवण्यासाठी मतदार यादीतील मयत आणि स्थलांतरित मतदार शोधून काढून ते वगळण्याचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिली आहे, ते मंत्रालयात पत्रकार परिषदेत बोलत होते.

सुमारे ३२ लाख मतदारांची संख्या ही योग्य पद्धतीने नसल्याचे दिसून आल्याने त्याची तपासणी करण्यात आली त्यापैकी १२ लाखांची तपासणी पूर्ण झाली आहे, त्यात २६ टक्के मतदार यादीमधून वगळले जातील . याचप्रमाणे ८० अथवा जास्त वय असलेल्यांची तपासणी देखील करण्यात येत आहे, अशा ३१ लाख संख्येपैकी २३ टक्के नावे मयत अथवा स्थलांतरित झाले असल्याचे दिसून आल्याचे देशपांडे यांनी सांगितले. ही नावे वगळली गेल्याने मतदारसंख्या कमी होईल आणि त्यासमोर मतदानाचे प्रमाण वाढलेले दिसेल असे ते म्हणाले.

२०२३ सालापर्यंत अठरा ते वीस दरम्यानच्या युवकांची लोकसंख्या ४५ लाख इतकी होणे अपेक्षित असल्याने राज्यातील सर्व कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांना लेखी सूचना देऊन तिथेच मतदार नोंदणी प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याचेही देशपांडे यांनी यावेळी सांगितले. आतापर्यंत यापैकी केवळ आठ टक्के मतदार नोंदणी झाली असून ती याद्वारे वाढविण्याची ही योजना आहे. वीस ते तीस दरम्यानच्या वयातील सुमारे ७५ टक्के लोकांनी नोंदणी केली आहे, तीही वाढविण्याचा प्रयत्न सुरू आहे. ५ जानेवारी २०२४ ला पहिली अंतिम मतदार यादी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रसिद्ध केली जाणार आहे, त्यानंतर गरजेनुसार पुरवणी याद्या प्रसिद्ध होतील असे ही श्रीकांत देशपांडे यांनी सांगितले.

mmcnews mmcnews

Related post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *