पुणे – मिरज – लोंढा मार्गाचे चौपदरीकरण
सांगली, दि. 19 (एमएमसी न्यूज नेटवर्क):पुणे ते मिरज रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण विद्युतीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असतानाच पुणे – मिरज ते लोंढा हा 466 किलोमीटर लांबीचा रेल्वे मार्ग चार लाईन चा होणार आहे. आगामी दहा वर्षात 2034 पर्यंत हा नवीन रेल्वे मार्ग उभारला जाणार आहे, हे लक्षात घेऊन पुलांची उभारणी केली जात आहे. सांगली जवळील चिंतामणी नगरचा पूलही त्यासाठी चार पदरी लांबीचा केला जाणार आहे. यामुळे कोल्हापूर – मिरज – सांगली – पुणे हा रेल्वे प्रवास वेगवान होणार आहे. दरम्यान सांगली – कोल्हापूर – मिरज मार्गावर मुंबईच्या धर्तीवर लोकल गाड्या सुरू करण्याचे नियोजन रेल्वे विभागाने केले आहे. पहिल्या टप्प्यात या कामासाठी 46 70 कोटी रुपयांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातारा- पुणे दरम्यान घाट विभागात नवीन ट्रॅक टाकण्यात येणार आहे त्यासाठी जमीन अधिग्रहण करण्याचे काम सुरू झाले आहे . कोरोनामुळे रेल्वेच्या विस्तारीकरणाचे हे काम दोन वर्षे रेंगाळले होते, पण आता या कामाने गती घेतली आहे. पुणे – मिरज ते लोंढा या मार्गाचे विद्युतीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण झाले आहे. पुणे ते मिरज हे अंतर 280 किलोमीटर असून मिरज ते लोंढा हे अंतर 186 किलोमीटर आहे या मार्गावर रोज धावणाऱ्या गाड्यांची संख्या तीस असून एकूण पुलांची संख्या 328 आहे.
ML/KA/PGB 19 Jun 2023